सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड, रिक्षाचालकांकडून दुप्पट भाडे आकारणी

वसई: पालिकेची परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे करोनामुळे रिक्षांमध्ये दोनच प्रवाशांची परवागनी असल्याने प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा ही खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. करोनाच्या काळात मागील वर्षी ठेकेदाराने अंग काढून घेतल्याने परिवहन सेवा पुर्णपणे ठप्प झाली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेने नवीन ठेकेदार नेमून परिवहन सेवा सुरू केली होती. पुर्वी पालिकेची परिवहन सेवा ही ४३ मार्गावर होती. परंतु ९ महिने झाले तरी ही सेवा केवळ १८ मार्गावर सुरू आहे. नालासोपारा पश्चिमेकडील गास,निर्मळ,नाळा,राजोडी, सत्पाळा,उमराळे-करमाळे, या मार्गावर टाळेबंदीपूर्वी सुरु असलेली महापालिकेची परिवहन सेवा बंद आहे. त्यामुळे या गावातील चाकरमानी, विद्यार्थी, शेतकरी, महिला,अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी, व कष्टकरी लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, असे आम आदमी पक्षाचे नालासोपारा अध्यक्ष जॉय फरम्गोस यांनी सांगितले. पुर्वी या मार्गावर एसटीची सेवा होती. नागरिकांना त्याचा आधार होता. पालिकेची परिवहन सेवा असल्याने एसटी बंद करण्यात आली. मात्र परिवहन सेवेने या मार्गावरील बससेवा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हीच परिस्थिती शहरातील अनेक भागांमध्ये दिसून येत आहे. लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्याशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना शहरात फिरण्यासाठी रिक्षांचा वापर करावा लागतो. करोनाच्या नियमावलीमुळे एका रिक्षात केवळ दोनच प्रवाशी घेतले जातात. त्यामुळे दुप्पट भाडे आकारले जातात. आधीच रिक्षाचे भाडे महाग, त्यात दुप्पट भाडे यामुळे सर्वसामान्यांचा खिशाला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. मला कामानिमित्त शहराच्या विविध भागात फिरावे लागते. पुर्वी पालिकेच्या बस मधून सहज प्रवास करता यायचा परंतु आता बसेसे मार्ग कमी झाले आहेत आणि फेर्याही कमी झाल्याने तासनतास बसची वाट बघावी लागते आणि नाईलाजाने रिक्षा करावी लागते, असे नालासोपार्याच्या विजय नगर येथे रहाणार्या महेश गोहील याने सांगितले.

आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गामध्ये वाढ करत आहोत. सध्या एकूण १८ मार्गावर सेवा सुरू आहेत. आम्ही १७ सीएनजी आणि २ विद्युत बसेस मागविल्या आहेत. त्यामुळे लवकरच परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे पालिकेच्या परिवहन समितीचे सभापती प्रितेश पाटील यांनी सांगितले.