खावटी अनुदान योजनेतील साहित्य पडून

खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना जीवनावश्यक संच तयार करून त्याचे वाटप केले जात आहे.

जीवनावश्यक वस्तू खराब होण्याची शक्यता

वसई :  खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना जीवनावश्यक संच तयार करून त्याचे वाटप केले जात आहे, परंतु वसईच्या पूर्वेच्या भागात वाटपासाठी आणलेले साहित्य हे महिनाभरापासून तसेच पडून राहिले आहे. त्यामुळे हे साहित्य खराब होऊन जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

करोनाच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. यात या बांधवांना चार हजार रुपये कुटुंब अनुदान दिले जात आहे. यातील दोन हजार रुपये बँक खात्यात व दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत.

यामध्ये  मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती अशा सर्व वस्तूंचा संच करून कुटुंबास वाटप केला जात आहे. त्या त्या विभागानुसार संच वाटपाची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यानुसार वसईतही विविध ठिकाणी याचे वाटप करण्यात आले आहे, परंतु त्यातीलच काही संच हे नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये आणून ठेवण्यात आले आहेत. महिनाभरापासून हे संच तसेच पडून राहिल्याने यात असलेल्या जीवनावश्यक वस्तू खराब होऊन जाण्याची शक्यता आहे. जवळपास ४० ते ४२ कुटुंबांचे संच त्या ठिकाणी पडून असल्याचे चित्र दिसून आले आहे.

याबाबत ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्याशी चर्चा केली असता आपल्या विभागातील खावटीचे संच कधीच वाटप केले आहेत. हे जे आताचे संच आहेत ते दुसऱ्या ठिकाणचे असून त्यासाठी नेमलेल्या अधिकारी यांनी याच ठिकाणी ठेवले आहेत. याबाबत अनेकदा त्यांना याची कल्पना दिली आहे. ते संच असेच पडून राहिले तर खराब होतील, परंतु अजूनही संच नेण्यासाठी कोणीच आले नाही. ज्यांच्यासाठी या वस्तू आहेत त्यांना या वस्तूंचे वेळेत वाटप झाले तरच त्याचा फायदा चांगला लाभार्थ्यांना होईल, परंतु सध्या तसे होत नसल्याने हे धान्य पडून राहिले आहे.

खावटी बातमी कोट

चंद्रपाडा येथे ठेवण्यात आलेले खावटीचे संच उचलण्याच्या संदर्भात संबंधित भागातील अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत. लवकरच ते संच उचलले जातील व जे याचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहचविले जातील.

– नरेंद्र संखे, विस्तार अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Material khavati grant scheme ysh

Next Story
धोकादायक इमारतीचा प्रश्न प्रलंबित
ताज्या बातम्या