१२० कोटींचा प्रकल्प; उद्यानात फुलपाखरू आणि दुर्मीळ वनस्पती उद्यानासह विविध सुविधा

भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथील निसर्गरम्य परिसरात आगळेवेगळे जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. १२० कोटी रुपयांचे हे उद्यान आता वनविभागामार्फत तयार केले जाणार आहेत. दुर्मीळ झाडे, फुलपाखरांचे उद्यान, विरंगुळा केंद्र, ट्रेकिंग आदी विविध सोयीसुविधा या उद्यानात असणार आहे.

मीरा-भाईंदर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तसेच पर्यटनस्थळ म्हणून जैवविविधता उद्यान उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील ३१ हेक्टर जागेची निवड करण्यात आली होती. त्यासाठी १२० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे  (एमटीडीसी) तयार करण्यात येणार होता. या उद्यानासाठी निधी मिळावा यासाठी पालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला होता. ही जागा राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने १ रुपये प्रति चौ. फूट भाडय़ाने ३० वर्षांकरिता नूतनीकरणाच्या अटीवर देण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आला होता. मात्र महसूल विभागाकडून जागा हस्तांतरित होत नव्हती. त्यामुळे चार वर्षांचा कालावधी वाया गेला होता. त्यामुळे राज्याचे पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आणि आमदार गीता जैन यांच्याशी चर्चा केली.  विविध परवानग्या आणि इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन हे उद्यान वनविभागामार्फत तयार केले जावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे हे उद्यान आता वनविभाग आणि राज्याच्या इको टूरिझम विभागामार्फत विकसित केले जाणार आहे.

जैवविविधता उद्यान असे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटनाच्या दृष्टीने हे उद्यान विकसित केले जाणार आहे. या जैववविविधता उद्यानात जैविक दुर्मीळ वनस्तपी, फुलपाखरू उद्यान, निसर्गाच्या विविध अंगाची माहिती देणारे केंद्रे, मुलांचे खास उद्यान, तिवरांमध्ये मॅंग्रोज बोर्ड वॉक, ट्रेकिंग ट्रोल, अ‍ॅम्पी थिएटर आदींचा समावेश असणार आहे. या जैवविविधता उद्यानामुळे पालिकेच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांना निसर्गाशी जोडले जातील असा विश्वास पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केला.