Pratap Sarnaik and Ganesh Naik/ भाईंदर: आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरा भाईंदर शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या शहरात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी तब्बल अकरा वर्षांनंतर ‘जनता दरबार’ घेऊन सक्रिय राजकारणात जोरदार ‘एन्ट्री’ केली आहे. परंतु, नाईकांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात थेट सरनाईक यांच्याशी संबंधित एक तक्रार पत्र समोर आल्याने, नाईक विरुद्ध सरनाईक हा राजकीय संघर्ष पेटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, मिरा भाईंदरच्या राजकारणापासून अकरा वर्षे दूर राहिलेल्या गणेश नाईक यांनी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या दरबाराला सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि आपल्या तक्रारी मांडल्या.
या गर्दीतच, प्रभाग क्रमांक १४ मधील स्थानिक आदिवासी महिलांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे एक तक्रार पत्र सादर केले. हे पत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाने देण्यात आले होते आणि त्यात आदिवासी पाड्यातील वाढत्या समस्या आणि वन विभागाच्या जागेबाबतच्या अडचणी नमूद करण्यात आल्या होत्या. भाईंदरमधील माशाचा पाडा हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने येथील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी कसा संघर्ष करावा लागत आहे, याचे वर्णन या पत्रात होते. या समस्या वनमंत्र्यांनी मार्गी लावाव्यात, अशी मागणी पत्रात करण्यात आली होती. हे पत्र स्वीकारल्यानंतर मंत्री गणेश नाईक यांनीही त्यावर तत्काळ दखल घेत ‘बैठक घेण्याचा’ शेरा मारला.
परंतु, स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ज्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात, तेथील समस्या सोडवण्यासाठी त्यांना त्यांच्याच राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या वनमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रार पत्र पाठवावे लागणे, ही बाब राजकीय वर्तुळात अत्यंत आश्चर्यकारक ठरली आहे. सद्यस्थितीत राज्यात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये एकत्र असले तरी मिरा-भाईंदरमध्ये स्थानिक पातळीवर दोन्ही नेत्यांमध्ये वरचढ ठरण्याची स्पर्धा सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या पत्रावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर, प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हे पत्र आम्ही केवळ ‘जोडपत्र’ म्हणून आदिवासी महिलांना दिले होते,’ असा दावा कार्यालयाने केला आहे.
सेना भाजप वाद पेटण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी, ‘सरनाईक यांच्या मतदारसंघातील कामे आम्ही करत आहोत,’ असा थेट आरोप करून सरनाईकांना आव्हान दिले होते. त्यानंतर लगेचच, सरनाईक यांच्या तक्रारीचे पत्र गणेश नाईकांच्या दरबारात समोर आल्याने, भाजप विरुद्ध शिवसेना हा स्थानिक वाद येत्या काळात अधिक तीव्र होण्याची आणि मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
