भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमध्ये सलग चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी आतापर्यंत १५९ नवे विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले असून, एकूण पटसंख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेची स्थापना २००२ साली झाली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २८ शाळा, त्यासोबत २०२ शिक्षक, मिरा-भाईंदर नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. आज ही शाळांची संख्या वाढून ३६ झाली आहे. सध्या पालिकेकडे मराठी माध्यमाच्या २१, हिंदीच्या ४, तर उर्दू आणि गुजराती अशा एकूण ५ शाळा आहेत.
महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सामान्य व गरजू कुटुंबातील आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पालिकेकडून मोफत शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. मात्र, काही वर्षांपूर्वी पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याने आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल, असा समज नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने, विद्यार्थीसंख्येत घट होत असल्याचे चित्र होते. ही नकारात्मक धारणा बदलण्यासाठी प्रशासनाने २०२१ पासून विशेष प्रयत्न सुरू केले होते. यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य देणे, आधुनिक शिक्षणपद्धती लागू करणे, डिजिटल शिक्षण व्यवस्था सुरू करणे, दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच सीबीएसई शाळा सुरु करणे असे विविध उपक्रम राबवले गेले.
या उपाययोजनांमुळे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात ७२४८ विद्यार्थी होते, तर २०२३-२४ मध्ये ही संख्या ८९८२ वर पोहोचली. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ती ९४५४ वर गेली. आणि आता २०२५-२६ या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पटसंख्या ९६१३ झाली असून, गतवर्षाच्या तुलनेत १५९ नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे.
दहा हजार पटसंख्या होण्याचा अंदाज
मिरा-भाईंदर महापालिका शाळांमध्ये ९ जुलै २०२५ पर्यंत ९ हजार ६१३ विद्यार्थी शिकत असल्याचे आढळले आहे. मागील वर्षांच्या अनुभवावरून दरवर्षी ऑगस्ट अखेरीस नवीन विद्यार्थी प्रवेश घेतात. त्याशिवाय शिक्षकांमार्फत राबवली जाणारी “विद्यार्थी शोध मोहीम” देखील यंदा प्रभावी ठरत आहे. त्यामुळे चालू वर्षात विद्यार्थीसंख्या दहा हजाराच्या च्या घरात पोहोचेल, असा अंदाज शिक्षण अधिकारी दीपाली पोवार-जोशी यांनी व्यक्त केला.
पालिका शाळेतील विद्यार्थीची आकडेवारी
वर्ष | एकूण विद्यार्थी | झालेली वाढ |
२०२१-२२ | ६४२९ | ०० |
२०२२-२३ | ७२४८ | ८१९ |
२०२३-२४ | ८९८२ | १७३४ |
२०२४-२५ | ९४५४ | ४७२ |
२०२५-२६ | ९६१३ | १५९ |