भाईंदर : मिरा भाईंदर शहरात वाहतूक धोरणाच्या अंमलबजावणीस अखेर महापालिकेने सुरुवात केली आहे. यात वाहतूक पोलिसांच्या मदतीने आवश्यक ठिकाणी सूचना फलक उभारण्याचे काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे पैकी पन्नास ठिकाणी हे फलक उभारले जाणार आहे.
मिरारोड व भाईंदर शहरात सध्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक नियोजन करणे कठीण होऊ लागले आहे.यामुळे वाहतूक कोंडी, वाहनतळ प्रश्न अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील वाहतूक समस्या सुटावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून पाऊल उचलण्यात आले आहे.यामध्ये आयुक्तालयातील वाहतूक विभागाने मिरा भाईंदर महापालिकेच्या मदतीने शहराचे सर्वेक्षण करून विशेष असे वाहतूक धोरण निश्चित केले आहे.या वाहतूक धोरणाची ऑक्टोबर २०२३ मध्ये घोषणा करण्यात आली होती.
यात शहरातील ५७ ठिकाणी पार्किंग व नो पार्किंग, नऊ एकदिशा मार्ग व दोन ठिकाणी प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला होता.या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना फलक, निर्देशक फलक लागणे गरजेचे होते. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने मिरा भाईंदर महापालिकेकडे प्रस्ताव तयार करून दिशा दर्शक फलक,मार्गदर्शक सूचना असे फलक लावण्यात यावे अशी मागणी केली आहे.मात्र मागील दीड वर्षांपासून याकडे दुर्लक्ष केले जात होते.अखेर आता शहरात सूचना फलक उभारण्यांचे काम करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महापालिकेने घेतला आहे.यामध्ये पहिल्या टप्प्यात आवश्यक ठिकाणी फलक उभारण्यासाठी ठिकाणे सूचित करण्याचे प्रशासनाने वाहतूक पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे.
” मिरा भाईंदर शहरात पहिल्या टप्प्यात दीडशेपैकी पन्नास ठिकाणी सूचना फलक उभारण्यासाठी ठिकाणे सूचित करण्याचे पालिकेने सांगितले. त्यावरून वाहतूक विभागाकडून स्वतंत्र यादी तयार करून ती देण्यात आली आहे.” सागर इंगोले- वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( काशिमीरा- वाहतूक शाखा)
वसई विरारमध्ये अंमलबजावणी थंडावली
मिरा भाईंदर शहराप्रमाणे वसई विरार शहरात देखील वाहतूक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाकडून घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून वसई विरार महापालिकेला शहरात सूचनाफलक उभारण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार काही ठिकाणी महापालिकेने फलक उभारले आहेत.मात्र अपेक्षाप्रमाणे याकडे लक्ष दिले जात नसून वाहतूक पोलिसांवर कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार पुढे येऊ लागली आहे.