भाईंदर : मिरा भाईंदरच्या भाजप आमदाराच्या मालकीची वादग्रस्त जागा मेट्रोच्या कामात बाधित होत असल्यामुळे मागील दीड वर्षांपासून हे काम संथ गतीने सुरु असल्याचे आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे येत्या दिवसात भाजप- शिवसेना वाद पेटण्याची शक्यता आहे.

मागील पाच वर्षापासून मिरा भाईंदर शहरात ‘दहिसर भाईंदर मेट्रो मार्गीका ९’ उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.सध्या या प्रकल्पाचे स्थापत्य काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक व मार्गीकेचे काम पूर्ण केले जात आहे.यात आता या कामाचे विभाजन करून दहिसर ते काशिगाव पर्यंत टप्पा एक आणि काशिगाव ते नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा ठरवण्यात आला.यावरून येत्या वर्षभरात मेट्रो सुरु करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

मात्र आता यातील काशीगाव स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या कामात जागेचा तिडा निर्माण झाला आहे. ही जागा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवेन इलेवेन या कंपनीची असून महापालिकेच्या विकास आराखड्यात सर्व्हिस रोडसाठी आरक्षित आहे.त्यामुळे विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने २०२२ मध्ये कंपनीकडे मागणी केली आहे.परंतु यास कंपनी तयार होत नसल्यामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात फेर-बदल करून तेथील जीने जवळील नाल्यावर हलवले. मात्र आता ही नाल्यावरील जागा(१३३ मीटर )देखील आपल्या मालकीचे असल्याचा दावा करून कंपनीने हे काम थांबवले आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून हा जागेचा तिढा सुटू शकलेला नाही.सदर कंपनीने विकास हक्क प्रमाणपत्र घेऊन जागा देण्यास नकार दिला असून चालू बाजार भावाप्रमाणे पैसे देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.मात्र यामुळे प्रशासनाला २३ ते ३० कोटीचा फटका बसणार आहे.

दरम्यान शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यासोबत मेट्रोच्या कामाची पाहणी केली. सदर प्रकरणाची पूर्वकल्पना असल्यामुळे सरनाईक यांनी थेट मेहता यावर मेट्रोच्या कामात आडकाटी करत असल्याचे आरोप केले.इतकेच नव्हे तर पूर्वी आमदार नसताना असे अडथळे आणणे समजून घेण्यासारखे होते.मात्र आता लोकांनी भरोघोस मतांनी निवडून दिलेले असल्यामुळे हे काम मार्गी लावण्यास सहकार्य अशी आपण स्वतः विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली आहे.तर यातून ही मार्ग निघाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यास सांगणार असल्याचे देखील सरनाईक यांनी जाहीर केले आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया :

“माझ्यावर विनाकारण बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. संबंधित जागा शासन नियमानुसार महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मी आतापर्यंत सुमारे २५ पत्रे दिली आहेत. इतकेच नव्हे, तर विकास हक्क प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देखील माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे मी सदर जागा करार करून मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेला काहीही न घेता हस्तांतरित करण्यास तयार आहे.भविष्यात त्या ठिकाणी जर इमारत उभारण्यात आली, तर त्याबदल्यात मोबदला द्यावा, अशी विनंतीही मी महापालिकेकडे केली आहे. मात्र, सत्य बाजूला ठेवून सरनाईक कोणतेही आरोप करत असतील, तर ते योग्य नाहीत.उलट, सरनाईकांनी स्वतःच्या शहराबाहेरील जमिनीसाठी महापालिकेकडून २९ कोटी रुपये घेतल्याचा इतिहास सर्वांना माहित आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे.