भाईंदर : मिरा भाईंदरमधून निघणाऱ्या घातक कचऱ्यावर शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरण संतुलन राखणारा नवा घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या अर्थ व्यवहार विभागाने (डीईए) मान्यता दिलेल्या सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
मिरा भाईंदर शहरातून दररोज सुमारे ४५० टन कचरा निघतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उत्तन येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे संचालन मे. सौराष्ट्र एन्व्हायरो प्रोजेक्ट या संस्थेकडे असून, संस्थेची मुदत २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. प्रामुख्याने या प्रकल्पात कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, मात्र घातक कचऱ्यावर शास्त्रशुद्ध आणि पुरेशी वैज्ञानिक प्रक्रिया होत नसल्याने जल, वायू आणि भूप्रदूषण वाढत आहे.
भविष्यात शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा विचार करता महापालिकेला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त घनकचरा प्रकल्प उभारावा लागणार आहे. त्या दृष्टीने उत्तन येथील ३१ हेक्टर जागेवरच नवा प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रशासकीय ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे.
नव्या प्रकल्पात विशेष काय?
महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या नव्या घनकचरा प्रकल्पात स्वच्छ भारत अभियान तसेच घनकचरा नियम २०१६ आणि २०२४ नुसार मटेरियल रिकव्हरी सुविधा, वेस्ट टू एनर्जी, बायोप्लांट, ऑर्गॅनिक वेस्ट एनर्जी अशा एकात्मिक व वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम घनकचरा व्यवस्थापनाची सोय असणार आहे.
सल्लगारची जबाबदारी काय:
महापालिकेकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या सल्लागार संस्थेला ३० कोटी इतकी रक्कम अदा केली जाणार आहे. सदर संस्थेला घनकचरा प्रकल्प उभारण्यापूर्वी संकल्पनात्मक अहवाल तयार करण्यासाठी सेवा देणे, प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, पीपीपी प्रकल्पासह पायाभूत सुविधा प्रकल्प तयार करणे, प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेला केंद्र,राज्य निधी गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार करणे, आणि प्रकल्प उभारत असताना देखभाल करण्यासाठी जबाबदारी सोपवण्याचे प्रशासनाने मंजूर केलेल्या प्रशासकीय ठरवत नमूद करण्यात आले आहे.