भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या बांधकामाची स्थिती जाणून घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या ‘स्ट्रक्चर ऑडिट’च्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात नुकताच प्रशासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे.

शहरात ३० वर्षांहून अधिक जुन्या अनेक इमारती आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी या इमारतींचे बांधकाम कोसळून दुर्घटना घडण्याची भीती असते. म्हणून अशा जुन्या झालेल्या इमारतींना महापालिकेकडून नोटीस बजावली जाते आणि ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेण्यास सांगितले जाते. हे ऑडिट करण्यासाठी महापालिकेने बांधकाम अभियंत्यांच्या पॅनलची नियुक्ती केली आहे. तसेच, इमारतींच्या आकारमानानुसार शुल्क निश्चित केले जाते. परीक्षणासाठी संबंधित इमारतीच्या रहिवाशांनी हे शुल्क महापालिकेकडे जमा करणे आवश्यक असते.

आता आधुनिक पद्धतीने ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मंजूर करण्यात आलेले दर परवडत नसल्याची तक्रार अभियंत्यांनी केली होती. त्यावरून प्रशासनाने शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी संरचनात्मक परीक्षणासाठी २०१९ मध्ये शुल्क निश्चित केले होते. नगरविकास विभागाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार प्रशासनाने पुन्हा शुल्कवाढ केली असून, यासंबंधीचा प्रशासकीय ठराव आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी मंजूर केला आहे.

नवीन तंत्रज्ञान प्रणाली:

नव्या तंत्रज्ञानांतर्गत आता अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट, रिबाउंड हॅमर टेस्ट, कोअर टेस्ट, हाफ सेल पोटेन्शियल टेस्ट आणि कार्बोनेशन डेप्थ टेस्ट या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. यासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर होणार असून, परीक्षण अधिक अचूक होणार आहे.

स्ट्रक्चर ऑडिट शुल्क :

बांधकामाचा प्रकारजुने दर नवीन दर
तळमजली बांधकाम १५ हजार २० हजार
दोन मजली इमारत २१ हजार २५ हजार
चार ते सात मजली इमारत
३३ हजार
३५ हजार
सात मजल्यांहून अधिक इमारत ५० हजार ६० हजार