भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने ई-बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. यासाठी पालिकेला पंतप्रधान अनुदान योजनेअंतर्गत १०० ई-बस उपलब्ध होणार असल्याने त्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे. याबाबत नुकतेच प्रशासनाने धोरण निश्चित केले असून, कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा आहे. ही सेवा खासगी कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागाकडे एकूण १२९ बसगाड्या असून, त्या २७ मार्गांवर चालवल्या जात आहेत. दररोज या बसेसद्वारे १ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात.मात्र, शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत या बसेस अपुऱ्या ठरत आहेत. तसेच काही मार्गांवर बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, शहरातील प्रदूषण कमी व्हावे आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी पालिकेने ई-बस सेवा वाढवण्यावर भर दिला आहे.
सद्यस्थितीत परिवहन विभागाकडे ५५ ई-बस आहेत. त्यात भर घालण्यासाठी, मागील वर्षी केंद्र शासनाच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखी १०० ई-बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बसांच्या वापराबाबत प्रशासनाने नुकतेच धोरण निश्चित केले आहे. या सेवा चालवण्यासाठी जे.बी.एम. या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याशी लवकरच करार केला जाणार असल्याची माहिती परिवहन सेवेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.
असे आहे धोरण
मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ताफ्यात नव्या १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यामध्ये ९ मीटर लांबीच्या ४० बस आणि १२ मीटर लांबीच्या ६० बस असतील.या गाड्यांचा प्रति किलोमीटर खर्च अनुक्रमे ६३.४५ आणि ७०.९४ इतका ठरवण्यात आला आहे. यात बस चालवणे, देखभाल-दुरुस्ती, कर्मचारी वेतन आणि इतर बाबींसाठी वार्षिक सुमारे ८ कोटी ७५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.तसेच बस आगार व चार्जिंग स्टेशनच्या देखभालीसाठी वार्षिक ४ कोटी ५० लाख इतका खर्च निश्चित करण्यात आला आहे.