भाईंदर : जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरही दोन वर्षांपासून मुर्धा गावातील पशु दवाखाना ताब्यात घेण्यास मिरा भाईंदर महापालिकेकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे हा दवाखाना बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. भाईंदर पश्चिम येथे जिल्हा परिषदेच्या काळापासून पशु दवाखाना आहे.
पूर्वी या दवाखान्यात जनावरांवर उपचार केले जात होते.मात्र महापालिकेच्या स्थापनेनंतर या दवाखान्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.परिणामी दवाखाना बंद झाला.त्यानंतर पाच वर्षांपूर्वीच पशु प्रेमींनी आवाज उठवल्यानंतर यावर जवळपास २१ लाख रुपये खर्च करून हा दवाखाना सुरु करण्यात आला.परंतु मनुष्यबळाची कमतरता व इतर समस्या जाणवू लागल्याने पुन्हा त्याला टाळे मारण्यात आले. दरम्यान अगदी मोक्याच्या जागी पशु दवाखान्याची जागा असल्यामुळे ती सुरु करण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.याबाबतचा प्रशासकीय ठराव देखील करण्यात आला होता.तर महापालिकेच्या या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
तर हा दवाखाना महापालिकेच्या ताब्यात आल्यास महापालिकेला नव्याने अन्य ठिकाणी जागा व वास्तू उभारण्याचा खर्च करावा लागणार नाही आहे. शिवाय जिल्हाधिकारी मोफत ही जागा महापालिकेला वापरास देण्यास तयार असल्यामुळे एकूण खर्चात देखील बचत होणार आहे. मात्र प्रस्ताव पाठवून दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील याकडे प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष पणा करत करत असल्यामुळे संपूर्ण निर्णय रखडला असल्याची माहिती समोर आली आहे.तर दवाखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे आहे.
९० लाखाचा खर्च अपेक्षित
भाईंदर पश्चिमच्या मुर्धा गावातील पशु दवाखाना ताब्यात घेऊन तो चालवण्याची तयारी मिरा भाईंदर महापालिकेने दर्शवली आहे.त्यानुसार दवाखान्यात आवश्यक साहित्याची उभारणी व इतर मनुष्यबळ उभारण्यासाठी जवळपास ९० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष दवाखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे हा निर्णय थंडावला असल्याची माहिती मिळाली आहे.