रुग्णांना परस्पर योजनेत दाखल करून शासनाची लूट, रुग्णांकडूनही देयकवसुली
भाईंदर : करोना आजाराच्या उपचारात राज्य शासनाकडून महात्मा जोतिबा फुले जनाआरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहे. मात्र मीरा-भाईंदर शहरातील रुग्णालय चक्क या योजनेचा गैरवापर करून रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णालयांना शासनाकडून आणि रुग्णांनाकडून देखील पैसे प्राप्त होत असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर शहरातील पाच रुग्णालयांत राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य’अंतर्गत उपचार करण्यात येतात. यात फॅमिली केअर, कस्तुरी, तुंगा, भक्ती वेदान्त आणि चिरायू रुग्णालयाचा समावेश आहे. त्यामुळे या रुग्णालयात नागरिकांच्या सेवेकरिता ‘आरोग्य मित्र’ तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. या योजनेअंतर्गत करोनाबाधित रुग्णांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च राज्य शासनाकडून उचलण्यात येतो. तर केवळ महागड्या औषधाचा खर्च रुग्णाला उचलावा लागतो.
अशा परिस्थितीत मार्च व एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्ण उद्रेकामुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले होते. या काळात वरील रुग्णालयातदेखील मोठ्या संख्येने कोविड रुग्ण दाखल झाले होते.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णालयात रुग्णांना या योजनेसंदर्भात माहिती देण्यात येत नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तर काही रुग्णांना माहिती न देताच त्यांना परस्पर या योजनेत समाविष्ट करून फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे रुग्णाच्या नावावर थेट रुग्णांकडून आणि राज्य शासनाकडून पैसे उकळण्यात येत आहेत. अातापर्यंत साधारण ३५० हून अधिक रुग्णांना या योजनेत समाविष्ट केल्यानंतरदेखील पैसे घेण्यात आले आहेत. तर काही रुग्णांना केवळ २० हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात रुग्णांचे कुटूंबीय सातत्याने तक्रार करूनदेखील त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त करत आहे.
चिरायू रुग्णालयावर कारवाई
भाईंदर पूर्व येथील चिरायू या रुग्णालयाची राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या रुग्णालयात बळीराम भाटकर नामक रुग्ण उपचार घेत होते. काही काळाने त्यांचे निधन झाल्यानंतर रुग्णालयामार्फत ४ लाख २९ हजार रुपयांचे बिल कुटुंबीयांना देण्यात आले. रुग्णांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत बिल आकारणी करण्याची मागणी करण्याकरिता अधिक माहिती घेतली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्या रुग्णांचे पूर्वीपासून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत रजिस्ट्रेशन करण्यात आले असल्याची बाब उघडकीस आली. तर रुग्णालय बिल कमी करण्यास तयार नसल्याने कुटुंबीयांनी याची तक्रार परळ येथे असलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यालयात केली. त्यानंतर रुग्णालयाकडून रुग्णांची फसवणूक केल्याचे आढळल्यानंतर अधिकाऱ्यांकडून रुग्णालयावर कारवाई करण्यात आली. यात रुग्णाला तब्बल ३ लाख ३७ हजार रुपयांची परतफेड करण्यात आली. तसेच याच प्रकारे अमित दळवी यांनी फॅमिली केअर व शैलेश रिवोलो यांनी कस्तुरी रुग्णल्यानेदेखील फसवणूक केल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली आहे. तर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप मीरा भाईंदर युवक काँग्रेस अध्यक्ष दीप काकडे यांनी केले आहेत.
या संदर्भात राज्य शासनाकडून आदेश आल्यामुळे आम्ही रुग्णांचे पैसे परत केले आहे. -डॉ.विवेक दुबे, चिरायू रुग्णालय प्रमुख.
ज्या रुग्णालयाकडून फसवणूक करण्यात येत आहे.त्यांची तक्रार आमची आरोग्य मित्राकडे करावी. आरोपात तथ्य आढळण्यास अश्या रुग्णाल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. – प्रीती, अधिकारी, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना