वसई: वसई विरार मधील ४ शहरांना जोडणार्या रिंगरूट प्रकल्पाचे स्वप्न अखेर लवकरच पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यात शहरातील ७ उड्डाणपूल, ४ रेल्वे उड्डाणपूल आदी नव्या प्रस्तावांबरोबर रिंगरुटच्या जुन्या प्रस्तावाचा समावेश आहे. वसई विरार मधील ४ शहरे आणि २२ गावांना एकाच रस्त्याने जोडणारा रिंगरूट हा प्रकल्प आहे. त्यासाठी ४० मीटरचा रुंदीचा आणि ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता उभारला जाणार आहे.
या प्रकल्पाच्या आराखडा आणि जागां च्या सर्वेक्षणाचे काम २०१९ मध्येच पूर्ण झाले होते. पालिकेने या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडे सव्वादोन हजार कोटींची मागणी केली होती. आता हा खर्च अडीच हजारांच्या घरात गेला आहे. निधी मंजूर होत नसल्याने प्रकल्पाच्या कामात अडचणी येत असल्याचे पालिकेने यापूर्वी स्पष्ट केले होते. याशिवाय अनेक वर्षांपासून हा प्रकल्प भूसंपादन, प्रकल्पाच्या जागेवर झालेली बांधकामे यामुळे हा रिंगरूट प्रकल्पाची रखडपट्टी झाली आहे. त्यामुळे वसई विरारच्या जनतेला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी शहरासाठी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई विरारचे लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली यावेळी रिंगरूट प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी यासाठी आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी प्रश्न उपस्थित केला होता. २००७ साली हा सिडकोने प्रकल्प नियोजन केला होता आजतागायत या प्रकल्पाच्या जागांचे भूसंपादन न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी नव्याने सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले होते. यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली. या प्रकल्पाचे पुन्हा सर्वेक्षण करून नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदारांनी सांगितले आहे.
वेळेची बचत होणार
प्रस्तावित भव्य असा रिंग-रोड गास-कोपरी येथून सुरू होऊन चिखलडोंगरे-बोळींज-सोपारा शुर्पारक मैदानाजवळच्या मार्गे-बरामपूर-उमेळे-जूचंद्र-माणिकपूर-आचोळे-तुळींज-विरार फुलपाडा-कोपरी-गासकोपरी असा हा रिंगरूटचे नियोजन करण्यात आले आहे. या वसईतील सर्व शहरे एकाच रस्त्याने जोडली जाणार आहेत त्यामुळे वेळेची ही बचत होणार आहे.
मार्गातील बांधकामांचे आव्हान
या मार्गाच्या कामासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागेत अनेक विकासकांनी अनधिकृत बांधकामे उभारली आहे. या रिंग-रोड रस्त्याखाली बाधित होणार्या जमिनीची गावनिहाय यादी पालिकेत भूसंपादनासाठी सादर आली होती. यात टिवरी, नारिंगी, गास, उमेळे, बरामपूर, समेळपाडा, सोपारे, विरार, कोपरी, गोखिवरे, जूचंद्र, तुळींज, डोंगरी, बोळींज, आचोळे, मोरे, राजावली, माणिकपूर, बोळींज, करमाळे, निळेमोरे, दिवाणमान गावामधील जागांचे भूसंपादन करावे लागणार होते. आता येथील कमी कमी बांधकाम क्षेत्र बाधित होऊ नये यासाठी नवीन सर्वेक्षणात मोकळ्या जागांचा प्राथमिक तत्त्वार विचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.