वसई : पावसाळा सुरू झाल्यापासून नायगाव ते बापाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर अखेर पालिकेने या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नायगाव पूर्वेच्या भागातून नायगाव- बापाणे असा महामार्गाला जोडणारा ५.२ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. परंतु या रस्त्याची देखभाल दुरुस्ती योग्य रित्या केली जात नसल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे तयार झाले होते. या खड्डयातून प्रवास करताना रिक्षाचालक यांच्यासह वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत होता.
विशेषतः पावसाळा सुरू झाल्यापासून स्टार सिटी, कर्मवीर भाऊराव विद्यालया समोर, वाकीपाडा यासह विविध ठिकाणी खड्डे पडले होते. अशा खड्ड्यातून प्रवास करताना शाळकरी विद्यार्थी यासह इतर वाहनचालकांना ही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याशिवाय पाऊस सुरू होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यात असे खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.
या खड्ड्यांच्या समस्येबाबत नायगाव येथील ग्रामस्थांनी नुकताच आंदोलन केले होते. याशिवाय राजकीय पक्षाचे पुढारी , सामाजिक कार्यकर्ते यांनी ही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पालिकेकडे केली होती. अखेर पालिकेने खडीकरण करून त्यावर डांबर टाकून रस्ता दुरुस्त केला जात आहे. तर काही ठिकाणी खडीकरण, मास्टिकचा वापर केला जात आहे. या खड्ड्यांच्या दुरुस्तीमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
कायमस्वरूपी काँक्रिटिकरण हवे
नायगाव- बापाणे या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत आहेत. विशेषतः दोन्ही बाजूने झालेले माती भराव, गटार व्यवस्थेचा अभाव यामुळे पाणी साचून राहते त्यामुळे खड्ड्यांची समस्या अधिक वाढत आहे. यासाठी या रस्त्यांचे कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.सुरवातीला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. वर्षभरापूर्वीच हा रस्ता वसई विरार महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. पालिकेने या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव एम एम आर डी ए ला सादर केला आहे मात्र त्याला अजूनही निधी न प्राप्त झाल्याने काम रखडले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.