|| कल्पेश भोईर

वीज देयके थकीत ठेवणाऱ्यांना महावितरणचा दणका

वसई: वसईच्या महावितरण विभागाने थकीत राहिलेल्या वीज देयकांच्या वसुलीसाठी सुरुवात केली आहे. मात्र अजूनही काही वीजग्राहक वीज देयके भरणा करण्यासाठी पुढे येत नसल्याने महावितरण विभागाची १६० कोटीं रुपयांची देयके थकीत राहिली आहेत.

वसई विरार शहरात महावितरणच्या वसई विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी वीजपुरवठा केला जात आहे. यामध्ये घरगुती, औद्योगिक, कृषी, व्यावसायिक अशा ९ लाख ३४  हजार वीजग्राहकांना पुरवठा होतो, परंतु मागील महिन्यांपासून काही वीजग्राहकांनी अजूनही महावितरण विभागाची वीज देयके भरलेली नाहीत याचा मोठा फटका हा महावितरणला बसू लागला आहे.

मागील वर्षी करोना संकटामुळेही अशाच प्रकारे वीज देयकांची थकबाकी शिल्लक राहिली होती. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही अनेक ग्राहकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक राहिली आहे. यात घरगुती वीजग्राहकांची ९६ कोटी, व्यापारी ३४ कोटी, औद्योगिक १५.५० कोटी , स्ट्रीटलाइट १२ कोटी, पाणीपुरवठा ४२ लाख, सार्वजनिक वापर १ कोटी ४६ लाख व इतर         यांचा समावेश आहे. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा महावितरणने थकीत राहिलेल्या वीज देयकांची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही काही वीजग्राहक वीज देयके भरण्यासाठी पुढे येत नसल्याने अजूनही वसई-विरार विभागातील एकूण १६० कोटींची वीज देयके शिल्लक राहिली आहे. ही शिल्लक राहिलेली वीज देयके ग्राहकांनी लवकर भरणा करावी यासाठी वीज देयक भरणा केंद्र व ऑनलाइन वीज देयके भरणा, अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर ज्या ग्राहकांची अडचण आहे त्यांनाही टप्प्याटप्प्याने वीज देयके भरण्यास सांगितले जात आहे. थकबाकीदारांनी वीज देयके लवकर अदा करून महावितरण विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने ग्राहकांना केले आहे.

वीजजोडण्या खंडित करण्याची मोहीम

ग्राहकांनी वीज देयके भरण्यासाठी पुढे यावे यासाठी महावितरणकडून ग्राहकांना आर्जव व विनंत्या करण्यात येत आहे, तर जे मोठ्या रकमेचे वीजग्राहक आहेत त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत, परंतु काही वीजग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून वीज भरणा करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशाग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ३५ हजार ८०९   ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली आहे. या ग्राहकांची अंदाजे ४० कोटी रुपयांची थकबाकी  आहे.

 

महावितरणची मोठ्या प्रमाणात वीज देयकांची रक्कम थकीत राहिली आहेत. ते वसूल करण्याचे काम सुरू केले आहे. जे ग्राहक वीज देयके भरण्यास पुढे येत नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांनी लवकरात लवकर थकीत वीज देयकांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. – राजेशसिंग चव्हाण, अधीक्षक अभियंता महावितरण विभाग वसई