वसई: पालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे पालिकेच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईला वेग आला आहे. सोमवारी प्रभाग समिती जीमध्ये विविध ठिकाणी २४ हजार चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणात फोफावली आहेत; परंतु पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असे. त्यामुळे ही बांधकामे जोमाने सुरू होती. याबाबत विविध प्रकारच्या तक्रारी पालिकेकडे येत होत्या. यामुळे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेत यापुढे ज्या प्रभागात अनधिकृत बांधकामे उभी राहतील त्या ठिकाणच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. या इशाऱ्याचा परिणाम होऊन पालिकेच्या विविध भागांतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग आला आहे. 

सोमवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रभाग समिती जीमधील राजावळी पालनगर येथे १ हजार फुटांचा गाळा, चिंचोटी सव्‍‌र्हे क्रमांक ८५ मध्ये २ हजार चौरस फुटांचे दोन गाळे, कामण मोमया डेरी येथे ८ हजार चौरस फुटांचा गाळा, तर वालीव येथील सव्‍‌र्हे क्रमांक ६६ मधील ३ हजार चौरस फुटांचा गाळा आणि १० हजार चौरस फूट पायाचे बांधकाम असे एकूण २४ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले, अशी माहिती पालिकेने दिली आहे. ही कारवाई प्रभाग समिती जीच्या प्रभारी सहायक आयुक्त नीलम निजाई, अभियंता कौस्तुभ तामोरे यांच्या पथकाने केली.