|| सुहास बिऱ्हाडे

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेचा त्रिसूत्री कार्यक्रम

वसई : वसई विरार महापालिकेने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीसाठी ‘मिशन  ३०० कोटी’चे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी त्रिसूत्री कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. मालमत्ता देयकांचे वितरण, मोबाइलवर संदेश-जनजागृती आणि लिलाव कारवाई आदी तीन स्तरांचा त्यात समावेश आहे.

वसई-विरार महापालिकेची सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षांच्या मालमत्ता कराची मागणी २८३ कोटी आहे. मागील वर्षाची थकबाकी ३५० कोटी आहे. मागील वर्षी करोनाच्या काळात पालिकेने २२१ एवढी विक्रमी करवसुली केली होती. त्यामुळे पालिकेचा उत्साह दुणावला आहे. यामुळे अधिकाअधिक करवसुली करण्यासाठी यंदा महापालिकेने मिशन ३०० कोटी राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला यश मिळत असून पहिल्या तीन महिन्यांत १७ कोटी रुपयांची वसुलीदेखील झाली आहे.

मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा पहिला भाग म्हणून मालमत्ताधारकांना वेळेवर देयके पोहोचविणे हा आहे.  त्यासाठी ९ प्रभागात घरपट्टी  विभागातील प्रशिक्षित   कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक मालमत्ताधारकाला देयक पोहोचले पाहिजे असे नियोजन करून हे पथक घरोघरी देयके पाठवत आहे. पालिकेचे ८ लाख ७५ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी २ लाख मालमत्ताधारकांना देयके पोहोचविण्यात आली आहेत. वेळेवर देयके न मिळाल्याने अनेकांना ती भरता येत नाहीत. त्यामुळे वेळेवर देयके पोहोचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात पालिकेला १७ कोटी रुपयांची कर वसुली झाली आहे. तर मागील ८ दिवसांत ८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ऑनलाइन कर भरण्यासाठी नागरिकांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने पालिकेने मालमत्ता कराची देयके प्रत्यक्ष वितरण करण्यावर भर दिला आहे.

मोबाइलद्वारे सतत आठवण

पालिकेकडे १ लाख मालमत्ताधारकांचे मोबाइल क्रमांक होते. मात्र हा तपशील  ३ वर्षे जुना होता. अनेकांचे क्रमांक बदलले होते. त्यामुळे पालिकेने आता प्रत्येक मालमत्ताधारकाचे प्रत्येकी दोन मोबाइल क्रमांकांची नोंद करायला सुरुवात केली आहे. विशेष उपयोजन (अ‍ॅप) द्वारे प्रत्येक मालमत्ताधारकाला मालमत्ता कर भरण्याचे लघुसंदेश, सतत आठवण  करून दिली जाणार आहे. दर पंधरा दिवसांनी मालमत्ताधारकांना हे लघुसंदेश  मिळणार आहे. याशिवाय ऑनलाइन कर भरणा प्रक्रियादेखील अधिक सोपी आणि सुलभ करण्यात आली  आहे.

जप्त मालमत्तांचा लिलाव

आतापर्यंत केवळ मालमत्तांची जप्ती केली जात होती. परंतु त्याचा लिलाव केला जात नव्हता. त्यामुळे पालिकेने लिलाव करण्याचे ठरवले आहे. करोनामुळे ही लिलाव प्रक्रिया थांबली होती. पण आता ती सुरू केली जाणार आहे. पालिकेने आतापर्यंत ६ हजार मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यातील ११० मालमत्तांचे बाजारमूल्य निश्चिात केले आहे. ही लिलाव प्रक्रिया सुरू केल्यानंतर इतर नागरिकांना जरब बसेल आणि ते मालमत्ता कर भरतील असा विश्वाास पालिकेने व्यक्त केला आहे.

मागील ३ महिन्यांत आम्ही १७ कोटी कराची वसुली केली आहे. मागच्या वर्षी आम्ही विक्रमी कर वसुली केली होती. यंदा आम्ही ३०० कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी देयकांचे वितरण, मोबाइलद्वारे लघुसंदेश पाठवणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे आदी कार्यक्रम राबविणार आहोत. – प्रदीप जांभळे-पाटील, उपायुक्त (कर) वसई-विरार महापालिका