वसई : वसई विरार शहरात मागील चार दिवसांपासून कोविडशिल्ड  लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने सलग चौथ्या दिवशीही पालिकेच्या क्षेत्रातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वसई विरार महापालिकेतर्फे  करण्यात येत असलेले लसीकरण हे अगदी धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक लशींची पहिली व दुसरी मात्रा मिळविण्यासाठी फरफट करीत आहेत. अशात पालिकेची लसीकरण केंद्र ही सातत्याने बंद राहू लागली आहेत. १ ऑगस्ट रोजी पालिकेचे लसीकरण पूर्णत: बंद होते तर २ ते ४ ऑगस्ट या दरम्यान पालिकेच्या क्षेत्रात केवळ नाममात्र लसीकरण सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे. यात वालीव येथील अग्रवाल केंद्रावर कोव्हॅक्सींनचे  प्रतिदिन १०० मात्रा व  कोविडशिल्ड व्हॅक्सींनचे गर्भवती महिलांसाठी तीन केंद्रावर लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लसीकरण केंद्र वगळता

इतर सर्वच केंद्र पालिकेने सलग चार दिवस बंद ठेवली आहेत. त्यामुळे लसीकरण करवून घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली आहे.