वसई: नालासोपाऱ्यातील मुख्य रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची मोठी गळती सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे चिखलमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे वाहिनी दुरुस्त न झाल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
नालासोपारा पूर्वेतील संगम मेडिकलजवळील भागातून मुख्य रस्ता गेला आहे. या मार्गावरून दररोज हलक्या तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र आठवड्याभरपासून मुख्य रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्ता चिखलमय झाला आहे.
तसेच, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. ज्यामुळे वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर सतत पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे पावसाळा संपूनही नालासोपाऱ्यातील रस्ते पुन्हा चिखलाने माखले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे इथून रोज मोठ्या संख्येने नागरिक, वाहनचालक ये-जा करत असतात. पण, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कामावर जाणारे चाकरमानी, शालेय विद्यार्थी आणि परिसरातील रहिवाशांना दररोज निसरड्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तर वाहन घसरणे, खड्ड्यात वाहनाचे चाक अडकणे अशा विविध समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून ही परिस्थिती आहे. आम्ही रोज या रस्त्यावरून जातो, पण पाणी आणि खड्ड्यांमुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार सतत घडत आहेत. यामुळे मुलांची शाळेतून ने – आण करतानाही भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. तसेच फुटलेल्या जलवाहिनीमुळे अपघाताचा धोका वाढलाच आहे. पण, पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्यामुळे महापालिकेने तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. संबंधित अभियंत्यांना सांगून जलवाहिनी लवकरात लवकर दुरुस्त करून घेतली जाईल, असे प्रभाग ‘ड’ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया
नालासोपारा पूर्वेतील मुख्यरस्त्यलगतची जलवाहिनी फुटून आठवड्याभरापेक्षा अधिक दिवस झाले आहेत. तर दुरुस्तीअभावी जलवाहिनीतून पाण्याची गळती सातत्याने सुरू आहे. या जलवाहिनीतून रोज रस्ता ओलाचिंब व्हावा इतक्या पाण्याची गळती होत आहे. पण, वारंवार तक्रार करूनही जलवाहिनी दुरुस्त न झाल्यामुळे आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
