शहरात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव

विरार : वसई-विरार शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या श्वानांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. श्वानदंशाच्या दिवसाला ३० ते ४० घटना समोर येत आहेत. शहरातील श्वानांचा  वाढता उपद्रव असताना मागील १२ वर्षांपासून पालिकेने श्वानगणना कधीच केली नाही. यामुळे शहरात किती श्वान आहेत  याची माहिती मिळत नाही.

मागील काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा  त्रास अधिकच वाढत चालला आहे.  केवळ  नऊ  महिन्यांत भटक्या श्वानांकडून चावण्याच्या ११ हजार ७८९ घटना समोर  आल्या आहेत. यामुळे या श्वानांची वाढती संख्या जीवघेणी ठरत आहे. शहरात अंदाजे ६५ हजारांहून अधिक भटके श्वान असल्याचे समजते. पण पालिका केवळ  श्वान निर्बीजीकरणकरांच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवत आहे.  

नागरी वस्तीबरोबर भटक्या श्वानांची संख्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणीही वाढत आहे. अनेक पर्यटनस्थळी  मुख्यत: अर्नाळा सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना श्वान चावल्याच्या घटना आहेत. विरार मनवेल पाडा, कारगिल नगर, नागीनदास पाडा, श्रीपस्था, लक्षी नगर, रामनगर, संतोष भुवन, टाकी रोड मोरेगाव, बिलालपाडा, आचोळे, वालीव, जीवदानी पाडा, समेळ पाडा, वसंत नगरी  दिवाणमान, सातिवली, जुचंद्र आणि इतर वसई परिसरात श्वानांची संख्या वाढली आहे.

जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली की, दर पाच वर्षांंनी पशुगणना केली जाते यात श्वानांची संख्या सुद्धा गणली जाते. पालिकेनेसुद्धा ही गणना केल्याची माहिती पशुपालन आणि डेअरी विभागाला दिली आहे. असे असताना पालिका जर श्वानगणना झाली नसेल अशी माहिती देत असेल तर त्यांनी शासनाची फसवणूक केली असणार असे म्हटले आहे. तर पालिका मुख्य आरोग्य निरीक्षक नीलेश जाधव यांनी माहिती दिली की आजतागायत पालिकेने श्वानगणना केलीच नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. 

निर्बीजीकरण केंद्र बंद

पालिकेला शहरातील भटक्या, पाळीव श्वानांची संख्या माहीत नाही, त्याचबरोबर पालिका राबवत असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्रातील निर्बीजीकरण केलेल्या श्वानांचीसुद्धा कोणतीही आकडेवारी पालिकेकडे नाही. शहरात मोठय़ा प्रमाणात शहरात नागरिक भटक्या श्वानांची शिकार होत आहेत. पण पालिका याबाबत कोणतीही यंत्रणा राबवत नाही. पालिकेने प्रस्तावित असलेले तीन निर्बीजीकरण केंद्र बासनात गुंडाळले आहेत. केवळ एका केंद्रावर पालिका काम करत आहे.

श्वानदंशाच्या घटना

  • जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ – १८ हजार २६८
  • जानेवारी २०२०  ते डिसेंबर २०२० -१६ हजार २३७ 
  • जानेवारी २०२१ ते सप्टेंबर – ११ हजार ७८९