साहित्य खेरीदीसाठी कृषिसेवा केंद्रावर गर्दी; नांगरणी, मशागत, पेरणीची कामे सुरू

वसई: वसईत मोसमी पावसाला सुरुवात झाली असल्याने वसईच्या विविध ठिकाणच्या भागांत शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळ त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून सुरूच  आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची नांगरणी, शेतातील केरकचरा काढून शेतीची मशागत, भात पेरणी अशा विविध प्रकारच्या कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.

मागील वर्षी वसईत झालेला मुसळधार पाऊस व अवकाळी  पावसाने मोठय़ा प्रमाणात भात शेतीचे नुकसान केले होते.  या वर्षी तरी चांगला पाऊस होऊन चांगले पीक येईल या आशेवर शेतकरी पुन्हा  कामाला लागला आहे.  पेरणीसाठी बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषिसेवा केंद्रावर लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे नांगरणीसाठी  ट्रॅक्टर भाडय़ाने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅकटर मालकांकडे खेटे मारायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामाला  सुरुवात झाली असून पेरणीसाठी लागणारे सुधारित व संकरित भात बियाणे, खते, औषधे यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. तर काहींनी नांगरणी करण्यासही सुरुवात केली आहे. परंतु या वर्षी वाढत्या महागाईची झळही शेतकऱ्यांना बसली आहे. यामुळे शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, औषधे यांच्यासह लागणारी औजारे यांच्या किमती वाढल्या आहेत. नांगरणीसाठी भाडय़ाने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे भावही वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ट्रॅक्टरचे भाडे प्रतितास २०० रुपयांची वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यात काहींनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता ड्रम सिडर पद्धतीने शेती कसण्याचा प्रयोगही सुरू केला आहे.   तालुक्यात एकूण ८ हजार ६४७  हेक्टरच्या क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात येते.  मागील वर्षी ७ हजार ७३३ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यातआली होती. यंदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती  तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. या वर्षी वेळेआधीच पाऊस झाला त्यामुळे राबणीच्या शेतातील कोरड पेरणी जास्त प्रमाणात झाली नाही.

आता बियाणांला मोड आणून पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. उशिरा पेरणी केली तर पीक उशिराने येईल त्या वेळी पाऊस नसेल तर अडचणी निर्माण होतील.  यासाठी पेरण्या या वेळेवरच झाल्या पाहिजेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

—राजू घरत , शेतकरी वसई