वसई:  दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी शहरात आयोजक व गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. तर दुसरीकडे आगामी होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत दहीहंडी उत्सवापासूनच प्रत्येक सण-उत्सवात आपली छाप पाडण्याकरता राजकीय नेते आणि पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे चित्र  दिसून येत आहे. 

वसई विरार मध्ये विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर अनेक भागात मोठं मोठ्या दहीहंड्या बांधल्या जातात. या दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमते.

यंदाचा दहीहंडी उत्सवाचा माहोल अगदी  वेगळाच असून  दहीहंडी उत्सवावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडी, भाजप, शिवसेना ठाकरे गट, मनसे, शिवसेना शिंदे गट, तसेच अन्य संघटनांमार्फत दहीहंड्या लावण्यात येणार आहेत. आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडीसाठी पुढाकार घेतला आहे. 

समाज माध्यमे, रस्त्यावर, चौकात अशा सर्व ठिकाणी फलक बाजी करण्यात आली आहे. गोविंदा पथकांना व नागरिकांना आकर्षीत करण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू असून लाखोंची बक्षिसे देण्यात येणारं आहेत . विशेष म्हणजे मुख्य पक्षांमार्फत आयोजन करत असताना दहीहंडीच्या या राजकारणात अनेक सामाजिक संघटनांनी देखील प्रवेश केला आहे. अन्य पक्षातील आयोजकांपेक्षा आपली दहीहंडी सरस ठरेल व नागरिक कसे जमतील यासाठी मराठी आणि हिंदी कलाकारांना बोलविण्यात आले आहे.

साडे सहा हजार गोविंदांना विमा कवच

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विविध गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. येत्या १६ ऑगस्ट रोजी हा उत्सव साजरा करण्यात येणार असून वसई विरार मध्ये उंचावरील मनाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. त्यामुळे सध्या गोविंदा पथके सरावात व्यस्त आहेत. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याने त्यात जोखीमही तितकीच आहे. अशावेळी ‘विमा कवच’ असल्यास या गोविंदांना मोठा दिलासा मिळतो. हीच गरज लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही गोविंदा पथकांकरता मोफत अपघाती विमा जाहीर केला होता. त्याला वसई – विरार मधील गोविंदा पथकांनी प्रतिसाद दिला आहे. एकूण ९९ पथकांनी या विमा योजनेचा लाभ घेतला असून या ९९ पथकांमधील ६ हजार ६६० गोविंदांचा विमा पालिकेने उतरवला आहे. द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत हा विमा उतरविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.