विरार : वसई-विरार महानगरपालिकेकडून करोना दुसऱ्या लाटेचा काहीसा दिलासा मिळाला असताना तिसऱ्या संभाव्य लाटेची टांगती तलवार अजूनही तशीच आहे. या तिसऱ्या लाटेत बालकांवर अधिक प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून पालिकेने लहान मुलांचा संभाव्य धोका पाहून विरार बोळींज येथे १५० खाटांचे बालकांसाठी रुग्णालय सुरू केले आहे. पण हे रुग्णालय सुरू होण्याच्या आधीच दुरवस्थेत खितपत पडले आहे.
या रुग्णालयाचे काम थांबले असून या रुग्णालयात पावसात गळती सुरू झाली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात रुग्णालयात पाणी साचत आहे. त्याचबरोबर रुग्णालयाचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. तर दुसरीकडे पालिका या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून काही किरकोळ कामे बाकी असल्याचा दावा करत आठवडाभरात त्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली. हे रुग्णालय ० ते १२ वयोगटातील मुलांसाठी असणार आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या कारभाराची करोना दुसऱ्या लाटेने पुरती दैना केली. सर्वच आरोग्य यंत्रणेची कसोटी लागली होती. रुग्णांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत होते. त्यातही पालिकेचे केवळ एकच रुग्णालय असल्याने सर्व भार खासगी रुग्णालयांवर होता. यामुळे पालिकेने आरोग्य सेवा वाढविण्यावर भर देत लहान मुलांसाठी हे रुग्णालय तयार केले आहे.
तज्ज्ञांनी करोना तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पालिकेने विरार बोळींज येथील कोविड रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करून त्यात १५० खाटांची तजवीज केली आहे. यात सामान्य, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर या सुविधा असणार आहेत. बालरोगतज्ञाच्या निरीक्षणाखाली हे कक्ष चालवले जाणार आहे. यात लहान मुले हे पालकांच्या शिवाय उपचाराला प्रतिसाद देणार नाहीत म्हणून या ठिकाणी पालकांसाठी विशेष सुविधा केली जाणार आहे. अजूनही या रुग्णालयाचे काम अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे गळती सुरू झाली आहे. तर प्राणवायू वाहिन्याचे कामसुद्धा अपूर्ण आहे. तर येथील प्राणवायू प्रकल्पचोसुद्धा काम बंद आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी काम बंद असल्याची माहिती येथील कामगारांनी दिली आहे. यामुळे तिसरी लाट कधी येणार याची निश्चित माहिती नसली तरी पालिका मात्र अजूनही सुविधांच्या बाबतीत दिरंगाई करत असल्याचे दिसत आहे.