भाईंदर : भाईंदर पूर्व येथील गोडदेव गावात असलेले पालिकेचा जलकुंभ हे अत्यंत जुने झाला आहे. त्यामुळे या जलकुंभाला मोठय़ा प्रमाणात तडे गेले असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे पाणी परिसरातील सर्व ठिकाणी योग्य पद्धतीने वितरित व्हावे म्हणून पालिकेकडून जागोजागी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात सद्य:स्थितीत ३१ इतके जलकुंभ आहेत. मात्र यापैकी काही जलकुंभ हे अत्यंत जुने झाले असून त्यांची अवस्था बिकट झाली असल्याची तक्रार सातत्याने समोर येत आहेत.

अशा परिस्थितीत भाईंदर पूर्व येथील गोडदेव गावात १.२५ दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाचे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ साधारण २५ वर्षांहून अधिक जुने असल्याने त्याला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे तर या जलकुंभाच्या जिन्याचा भाग कोसळू लागला आहे, तर काही ठिकाणी गळतीदेखील सुरू आहे. त्यामुळे पाण्यात इतर विषाणू जाऊन आजाराचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच एखाद्या वेळेस जोरात पाण्याचा प्रवाह झाल्यास जलकुंभच कोसळण्याची शक्यता असल्याची लेखी तक्रार स्थानिक नागरिक पवन घरत यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्याकरिता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही.