वसई : गेल्या काही महिन्यांपासून वसई-विरार शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांना अक्षरशः हैराण केले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी नंतर अखेर पालिकेने शहरात खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. आतापर्यंत सुमारे अडीच हजार इतके खड्डे बुजविले असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

वसई विरार महापालिकेच्या हद्दीत १ हजार १६ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केलेले रस्ते आहेत. पण या डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नाही, ज्यामुळे दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याव्यतिरिक्त, खड्ड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी आणि मणक्याच्या आजारांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नायगाव-बापाणे रस्ता, विरार पूर्व, नालासोपारा, भोयदापाडा, वालीव आणि सातीवली यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी एक ते दीड फूट खोल खड्डे तयार झाले असून, वाहनचालकांची जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्यावरून कामानिमित्त शहराबाहेर जाणारे नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. पण, रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले.

नागरिकांच्या तक्रारी आणि वाढती नाराजी लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने खड्डे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातील खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेने २० कोटी रुपयांचे नियोजन केले आहे. यासाठी नऊ प्रभागांत १३ एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या एजन्सींमार्फत आतापर्यंत एकूण २ हजार ४३४ खड्डे बुजवण्यात आले आहेत. यामध्ये पेव्हर ब्लॉकद्वारे ६६, खडीकरणाद्वारे १,८०१, बीएमद्वारे ३४७ आणि मास्टिकद्वारे २२० खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

अजूनही खड्डे तसेच

वसई विरार शहरात पालिकेने खड्डे बुजविले असल्याचा दावा जरी केला असला तरी अजूनही विविध ठिकाणी खड्ड्यांची समस्या जैसे थे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांची पाहणी करून गणेशोत्सवा पूर्वी सर्व रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.