जप्त वाहने ठेवण्यासाठी पोलिसांकडे जागाच नाही

वसई :  पालिकेची उदासीनता आणि वाहतूक पोलिसांच्या तांत्रिक अडचणींमुळे शहरातील बेवारस आणि भंगार वाहनांची समस्या कायम राहिली आहे. या बेवारस वाहनांमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जागेची अडचण असल्याचे सांगून वाहतूक पोलिसांनी हात वर केले आहेत.

वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ही बेवारस वाहने भंगार अवस्थेत साचून धूळ मातीमुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ही बेवारस वाहने उचलण्यासाठी पालिकेने सुरू केलेली मोहीम थंड पडली आहे.

दुसरीकडे बेवारस वाहने जप्त केली तर ठेवायची कुठे, असा प्रश्न वाहतूक पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. बेवारस वाहनांची समस्या लक्षात घेऊन शहरातील दोन्ही परिमंडळांनी विशेष मोहिमेद्वारे वाहने उचलण्यास सुरुवात केली होती. या कारवाईत अनेक वाहने जप्त करण्यात आली होती. नंतर ती ठेवायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ही मोहीम पुन्हा थंड पडली आहे. याबाबत माहिती देताना, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी सांगितले की, आम्हाला बेवारस भंगार वाहने ठेवण्यासाठी आचोळा येथे पालिकेने जागा दिली होती. मुळात ही जागा अपुरी होती. पण आता त्या जागेवरही रुग्णालयाचे काम सुरू असल्याने आमच्याकडे दुसरी जागा नाही. त्यामुळे वाहने जप्त केली तरी कुठे ठेवायची असा प्रश्न आमच्यापुढे आहे, असे त्यांनी सांगितले.

मोहीमही थंडावली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 बेवारस वाहने हटवण्यासाठी पालिकेने काही महिन्यांपूर्वी दंडात्मक कारवाईचे आदेश काढले होते. पालिकेकडून बेवारस आणि पडीक वाहने जप्त केली जाणार होती. जप्त केलेल्या चारचाकी वाहनमालकांकडून ५ हजार रुपये, तीनचाकी वाहन मालकाकडून ४ हजार रुपये, दुचाकी वाहन मालकाकडून तीन हजार रुपये दंड आणि चारचाकीपेक्षा अधिक चाके असलेल्या वाहनांसाठी १० हजारांची रक्कम वसूल करण्याचे पालिकेने ठरविले होते. मात्र पालिकेची ही मोहीमदेखील कागदावरच राहिली आहे.