वसई : वसई विरार शहरात ४ रेल्वे उड्डाणपूल बांधण्यास अखेर रेल्वेने मंजूरी दिली आहे. या पूलांच्या निर्मितीसाठी ५०० कोटींचा खर्च अपेक्षित असून एमएमआरडीए आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हे पूल तयार केले जाणार आहे. या पुलांच्या निर्मितीमुळे वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.
वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या भरमसाठ वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची संकल्पना समोर आली होती.
वसईचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेमार्फत पाठपुरावा करत शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळमान (वसई), ओस्वालनगरी (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपूलांचा समावेश होता. या पूलांच्या निर्मितीसाठी प्रत्येकी दिडशे कोटींचा खर्च अपेक्षित होता. एमएमआरडीएने या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर पालिकेने त्यासंदर्भातील सर्वेक्षण आणि आराखडे पालिकेने सादर केले होते. या पूलाला मंजुरी मिळावी यासाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह ननालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा पाठपुरावा सुरू होता.
पालिकेने भरले १० कोटी रुपये
पूलांच्या निर्मितीचा प्रकल्प ५०० कोटींच्या घरात गेला आहे. रेल्वेच्या अखत्यारितील पूलाचा भाग रेल्वे तर उर्वरित पूल एमएमआरडीए बांधणार आहे. पूलाला रेल्वेकडून मंजुरी मिळावी यासाठी वसई विरार महापालिकेने १० कोटी रुपये रेल्वेकडे भरले होते. मात्र उमेळमान येथील पूलाला रेल्वेकडून परवानगी मिळत नव्हती. अखेर पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेने उमेळमान येथील चौथ्या रेल्वे उड्डाणपूलालाही परवानगी दिली आहे. पश्चिम रेल्वेचे विभागीय अभियंत्यांनी वसई-विरार महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना मंजुरीचे पत्र पाठविले आहे. त्यात चार रेल्वे उड्डाणपुलांच्या सर्वसाधारण संकल्पना आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन वर्षात पूल अपेक्षित
पुलाच्या निर्मितीचे अडथळे आता दूर झाले आहे. लवकरच एमएमआरडीकडून या पूलाच्या निर्मितीच्या निविदा काढल्या जातील. पुढील २ वर्षात या पुलाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा पालिका अधिकार्यांनी व्यक्त केली. यामुळे वसई विरारकरांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होणार आहे.
असे आहेत ४ उड्डाणपूल
१) उमेळमान (वसई)
२) ओस्वालनगरी (नालासोपारा)
३) अलकापुरी (नालासोपारा)
४) विराट नगर (विरार)