वसई-विरार शहरातील अनेक भागांत अजूनही पाणी साचून; नागरिकांचे हाल

वसई : गुरुवारी सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली आहे. मात्र या विश्रांती नंतरही वसई विरारच्या विविध ठिकाणच्या भागात साचून राहिलेले पाणी अजूनही ओसरले नसल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे अनेकांना घरातच अडकून राहावे लागले तर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.

वसई-विरार भागात गुरूवारी सकाळपासून अक्षरश: थैमान घातले होते. त्यामुळे वसई विरारमधील विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात साचले होते. यामुळे ये-जा करण्याचे बहुतांश मार्ग हे पाण्याखाली गेले. त्यामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली आहे  तरी  शहराच्या विविध भागात साचलेल्या पाण्याचा अद्यापही निचरा न झाल्याने बहुतेक भाग अजूनही पाण्याखाली  आहे. यात नालासोपारा पूर्व, स्टेशन परिसर, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकीपाडा, वसईतील सनसिटी रोड,  गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, विरार पश्चिम विवा कॉलेजरोड  येथील पाणी ओसरले नाही. वसईतील सनसिटी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करण्याचा मुख्य रस्ताही पाण्याखालीच आहे.  पश्चिमेतीलही अनेक गावातील साचलेल्या पाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानी, वाहनधारकांची मात्र पाण्यातून मार्ग काढताना मोठे हाल झाले. पालिकेच्या सर्व उपाययोजना फोल ठरल्याने शहरातील पाणी ओसरण्यास विलंब होऊ लागला आहे. जर एका दिवसाच्या पावसात शहराची अशी परिस्थिती होत असेल तर अजून पूर्ण पावसाळा जायचा बाकी आहे. त्यामुळे सातत्याने अशा पूरस्थितीचा सामना करावा लागेल अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.