|| रमेश पाटील

वाड्यात २० ते २५ टक्क्यांनी  विक्रीवर परिणाम

वाडा : संपूर्ण कोकणासह  नाशिक जिल्हयात फटाक्याचे शहर अशी ओळख असलेल्या वाडा शहरातील फटाके व्यावसायिकांना यंदा मंदीची झळ पोहोचली आहे.  २० ते २५ टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे.

 वाडा शहरातून संपूर्ण कोकणसह नाशिक, ठाणे, पालघर जिल्हयातील किरकोळ विक्रेत्यांना  वाडा शहरातून फटाका पुरविला जातो.  वर्षभर वाडा शहरात फटाक्यांचा व्यवसाय सुरू असतो. सध्या फॅन्सी फटाक्यांची धूम असून त्याचीच मागणी जास्त आहे. फॅन्सी  फटाक्याची किंमत ५० रुपयांपासून ते  दोन हजार  रुपयांपर्यंत आहे. यामध्ये शोभेचे फटाके, पाऊस, चक्री, फुलबाजे, रॉकेट,   डबल, ट्रिपल बार,  आकाशातील रंगीबेरंगी फटाके, सुतळी बॉम्ब, भुईचक्र आदी फटाके येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.   दरसुद्धा १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. करोनाच्या निर्बंधामुळे   छोटे उद्योग बंद पडले आहेत.  प्रदूषणकारक फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे समाजमाध्यमांवर  केले जाणारे आवाहन या  कारणांनी व्यवसाय  २० ते २५ टक्क्यांनी कमी झाला असल्याचे  विक्रेते सांगतात.

वाहतूक कोंडी

 फटाक्याची सर्व दुकाने  वाडा शहरापासून एक किलोमीटर लाब अंतरावर असल्याने या दुकानांकडे जाणारा रस्ता वाडा शहरातून जातो, हा रस्ता अरुंद आहे.  शहराकडे येणाऱ्या या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.  त्यामुळे वाड्यात सध्या रोजच वाहतूक कोंडीचे दृश्य दिसत आहे.

सुरक्षेची खबरदारी

 फटाके हे ज्वलनशील असल्याने काही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक दुकानात फायर नियंत्रण यंत्र बसवण्यात आले आहे. तसेच दुकानासभोवताली जलवाहिनी फिरवण्यात आली आहे. तसेच दुकानासमोर वाहनतळाची व्यवस्था  केली आहे. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फटाक्याच्या विक्रीत खूपच घट झाली आहे. आर्थिक मंदीमुळेच ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.  – नंदकुमार आंबवणे,  नंदकुमार ट्रेडर्स, वाडा

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर  संकट आले आहे आणि महिनाअखेरीस दिवाळी आल्याने नोकर वर्गाचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे फटाक्यांच्या किरकोळ विक्री व्यवसायावरसुद्धा परिणाम झाला आहे. -श्रीकांत भोईर, किरकोळ फटाके विक्रेता, कुडूस, ता. वाडा.