वसई-विरार महापालिकेच्या कर वसुलीच्या प्रयोगांना यश

वसई : चालू आर्थिक वर्षांत ४०० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या वसई-विरार महाालिकेने सप्टेंबर महिन्यातच १०० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सप्टेंबर महिन्यात १०० कोटींची वसुली पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे. कर वसुलीसाठी पालिकेने विविध प्रयोग राबवले असून त्याला यश मिळू लागले आहे.

वसई-विरार शहरात ८ लाख ७५ हजार मालमत्ताधारक आहे. २०२०-२१ या मागील आर्थिक वर्षांत महापालिकेने २२१ कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली होती. पुढील आर्थिक वर्षांत केंद्र शासनाकडून वस्तू सेवा कराचा ३६० कोटी रुपयांचा (जीएसटी) मिळणारा परतावा बंद होणार आहे. त्यामुळे यावर्षी पालिकेने ४०० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी शंभर टक्के कर वसुली करण्याबरोबर नवीन मालमत्ता शोधून त्यांच्याकडून कर आकारणी केली जाणार आहे. पालिकेच्या ‘मिशन ४००’ ला यश मिळत असून सप्टेंबर महिन्यातच पालिकेची १०० कोटींची वसुली झाली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच सप्टेंबर महिन्यात १०० कोटींची वसुली झाली आहे.

प्रत्येकाच्या दारावर कर्मचारी

एकीकडे नवीन मालमत्ता शोधून कर आकारणी करायची आणि दुसरीकडे अस्तित्वातील मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्यासाठी नऊ प्रभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाचे दहा उपप्रभाग बनविण्यात आले असून प्रत्येक उपविभागात एक स्वतंत्र कर्मचारी नेमून देण्यात आला आहे. हा कर्मचारी प्रत्येक मालमत्ताधारकांच्या दारात पोहोचणार आहे. मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत स्मरण करून देणार आहे. यामुळेही मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ होणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

कर आकारणी शिबिराचा प्रयोग यशस्वी

नवीन मालमत्तांना कर आकारणी करून कर संकलन करण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात कर आकारणी शिबिराचे आयोजन केले आहे. २० सप्टेंबरपासून सर्वच्या सर्व प्रभाग समितींत हे शिबीर सुरू झाले. या शिबिरात दररोज सरासरी ३०० मालमत्तांना कर आकारणी करून कर वसुली केली जात आहे. या शिबिरात कर आकारणीसाठी जे अर्ज येतात त्याच दिवशी संबंधित मालमत्तांची पाहणी करून कर निश्चित केला जातो आणि त्याच दिवशी कराचे देयक देऊन वसुलीही केली जात आहे. या शिबिरामुळे पालिकेच्या तिजोरीत दररोज दीड कोटी रुपयांची भर पडू लागली आहे. हे शिबीर प्रभाग समिती कार्यालयात असते. त्यामुळे सहाय्यक प्रभाग समिती आयुक्तांना त्यावर देखरेख ठेवून एकही अर्ज प्रलंबित न ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

शहरातील एकही मालमत्ता कराशिवाय राहू नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नवीन कर आकारणी आणि कराची वसुली अशी दोन्ही कामांवर भर दिला आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. दररोज दीड कोटी रुपयांची वसुली होत आहे. यामुळे आम्ही या वर्षी ४०० कोटी रुपयांचे विक्रमी उद्दिष्ट गाठू असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

प्रदीप जांभळे-पाटील, उपायुक्त (कर) वसई-विरार महापालिका