टाळेबंदीत रस्ते अपघातांत घट; मात्र मृत्यूंत वाढ

जानेवारी ते मेपर्यंत पालघर जिल्ह्य़ातील महामार्गावर ६३ अपघातांची नोंद  झाली आहे.

पाच महिन्यांत ६३ अपघात, ६४ जणांचा मृत्यू

विरार : जानेवारी ते मेपर्यंत पालघर जिल्ह्य़ातील महामार्गावर ६३ अपघातांची नोंद  झाली आहे. यात ६४ प्रवाशांचा बळी गेला आहे तर ७० प्रवासी गंभीर जखमी झाले तर १०० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती महामार्ग  पोलिसांकडून देण्यात येते.

करोना काळात टाळेबंदीत  खासगी वाहनाच्या प्रवासावर बंदी असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली होती. यामुळे सन २०१९ च्या तुलनेत २० आणि २१ मध्ये रस्ते अपघातात मोठी घट झाली होती. पण जानेवारीपासून टाळेबंदीच्या नियमांत बदल झाल्याने खासगी वाहनांना अटीशर्ती लावून प्रवासाच्या परवानग्या देण्यात आल्या यामुळे पुन्हा रस्ते अपघात वाढताना दिसत आहेत.

या संदर्भात माहिती देताना मालवाहतूक वाहनावर काम करणारे फिरोज अन्सारी यांनी माहिती दिली की, पालघरमधील अनेक ठिकाणी रस्ते वळणाचे आहेत. अनेक ठिकाणी रस्तेरुंदीकरणाचे काम रखडले आहे, काही ठिकाणी रस्ते निमुळते होत जातात त्या ठिकाणी फलक नाहीत. यामुळे अचानक चालक वाहनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जातो आणि अपघाताला बळी पडतो.   रस्ते मोकळे असल्याने काही चालक मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात, तर इतर वाहनांच्या पुढे जाण्याच्या नादात अपघात होत आहेत.

अपघातांची संख्या कमी असली तरी चिंताजनक आहे, पोलीस सातत्याने नाकाबंदी करत असल्याने वाहनांवर वेगाच्या मर्यादा येत आहेत, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक कमी होईल.

 —   विलास सुपे, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reduction unpaved road accidents increase in deaths ssh

ताज्या बातम्या