वसई : वाढती वीज ग्राहकांची संख्या यामुळे कामकाजात अडचणी येतात. ग्राहकांना चांगली वीज सेवा मिळावी यासाठी महावितरणच्या कार्यालयाचा विस्तार केला जात आहे. वसई पूर्वेच्या उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून नवीन पेल्हार उपविभागीय कार्यालय व शाखा यांची निर्मिती केली जाणार आहे.वसई विरार शहरात महावितरणच्या वसई मंडळ अंतर्गत वीज पुरवठा केला जातो. मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण वाढत असून इमारती, चाळी, औद्योगिक क्षेत्र यांचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत ही वाढ होऊ लागली आहे.सद्यस्थितीत साडे दहा लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत. त्यांना महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा यासह इतर वीज समस्या व ग्राहक सुविधा निवारण करण्यासाठी महावितरणने विभागीय व उपविभागीय कार्यालय तयार केली आहेत.
मात्र काही कार्यालयावर अधिक वीज ग्राहकांचा भार आहे. त्यामुळे सेवा देताना महावितरणला अडचणी येतात. काही वेळा उच्च दाबामुळे वीज पुरवठा खंडित होतो. तर ग्राहक संख्या जास्त असल्याने तेथील कामाचे नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. विशेषतः वसई पूर्वेच्या उपविभागीय कार्यालयावर अधिक भार आहे. यासाठी आता उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करुन नवीन पेल्हार उपविभागीय कार्यालय तयार केले जाणार आहे. तर त्याच अंतर्गत येणाऱ्या वालीव शाखा विभाजन करून नवीन पेल्हार शाखा स्थापन केली जाणार असल्याची माहिती महावितरण ने दिली आहे. यापूर्वी जे वीज ग्राहक होते तो भार निम्म्या स्वरूपात वाटून वीज सेवा दिली जाणार आहे.याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार असल्याचा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
असा होणार विस्तार
यापूर्वी वसई पूर्वेच्या उपविभागात गोखीवरे सेक्शन १,२,३, जूचंद्र, नवघर, सातीवली सेक्शन १ व २ कोल्ही व वालीव यांचा समावेश होता. यात २८७ उच्च दाब ग्राहक व २ लाख ५० हजार ९६० इतके ग्राहक समाविष्ट होते.यासाठी २४० मेगा व्हॅट इतका वीज पुरवठा केला जात होता.आता नवीन विभागाजन केल्या नंतर पेल्हार उपविभागात जूचंद्र व कोल्ही व वालीवचा काही भाग यांचा समावेश केला असून यात १८७ उच्च दाब व १ लाख ५७ हजार २६० वीज ग्राहक समाविष्ट केले आहेत.यात १४० मेगा व्हॅट इतका वीज पुरवठा होईल अशी माहिती महावितरणने दिली आहे.
सेवेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त
कार्यालयाचा विस्तार झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. पेल्हार उपविभागीय कार्यालयासाठी १२ पदे असून यात १० नवीन पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी १ लाख ५० हजारांची तर प्रशासकीय खर्चासाठी ५ लाख २५ हजार रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.तर शाखेसाठी १९ पदे असून २ नवीन पदे भरली जाणार आहेत. यासाठी २२ लाख ३२ हजार व प्रशासकीय खर्चासाठी १ लाख ७१ हजार रुपयांचे नियोजन करून खर्चास मंजुरी दिली असल्याचे महावितरणने सांगितले आहे.
पेल्हार नवीन उपविभागीय कार्यालय व शाखा तयार केली जाणार आहे.यामुळे ग्राहकाभिमुख दर्जेदार सेवा देणे शक्य होईल. कर्मचारी संख्या वाढेल,नियोजन करणे सोपे होईल, वीज गळती कमी करणे शक्य होईल,याशिवाय महसूलात ही वाढ होईल.संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई