scorecardresearch

सुपारी देणारा गुलदस्त्यात; समय चौहान हत्या प्रकरण

विरारमधील समय चौहान हत्या प्रकरणातील दोन मारेकऱ्यांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे, परंतु हत्येची सुपारी कुणी दिली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

crime
(प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई: विरारमधील समय चौहान हत्या प्रकरणातील दोन मारेकऱ्यांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे, परंतु हत्येची सुपारी कुणी दिली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणातील तिसरा आरोपी पोलीस चकमकीत मारला गेला आहे. त्यानेच सुपारी दिल्याचे पकडले गेलेले आरोपी सांगत आहेत, परंतु त्यामागील सत्य शोधण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.
विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान याची २६ फेब्रुवारी रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. एकूण चार मारेकऱ्यांनी हा हल्ला केला. मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्हे शाखेच्या पथकांनी महिनाभर तपास करून या आरोपींचा शोध लावला. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेशात पोहोचले. मात्र पोलिसांनी पकडण्यापूर्वीच मनीष सिंग हा आरमेपी उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता. चारपैकी राहुल शर्मा आणि अभिषेक सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली असून आणखी एक आरोपी फरार आहे. त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन, नियोजन करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले, मात्र या हत्येची सुपारी कोणी दिली ते अजूनही समजलेले नाही. राहुल शर्मा आणि अभिषेक सिंग हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच मयत मनीष सिंग यानेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र त्यामागील सत्य आणि खरा सूत्रधार शोधून काढण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. या मारेकऱ्यांना वसईत घेऊन आल्यानंतर आम्ही त्यांना इथे बोलते करू आणि सूत्रधार कोण ते शोधून काढूच, असा विश्वास गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे.
व्यावसायिक संबंधातून हत्या?
आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडून सत्य शोधून काढण्यासाठी कसून चौकशी करावी लागेल आणि त्यात वेळ लागेल अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिली. आरोपींनी मयत मनीष सिंग याला पुढे करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ज्या प्रकारे व्यावसायिक मारेकऱ्यामार्फत ही हत्या घडवली गेली ते पाहता कौटुंबिक किंवा खासगी वादापेक्षा व्यावसायिक वादाचे कारण त्यामागे असेल, अशी शक्यता उपायुक्त पाटील यांनी बोलून दाखवली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samay chauhan murder case police crime vasai virar police commissioner amy

ताज्या बातम्या