वसई : राज्य शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर पालघर जिल्हा आणि वसई-विरार शहरात गुरुवार, २७ जानेवारीपासून ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. १ ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा मात्र तूर्तास बंद राहणार असून करोनाच्या परिस्थितीनुसार त्या सुरू करण्याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या १२० शाळा, ७५२ खासगी शाळा, ४ वरिष्ठ महाविद्यालये, ३६ कनिष्ठ महाविद्यालये आणि ७ दिव्यांग शाळा आहेत. त्यामध्ये एकूण ३ लाख ९४ हजार २८९ शालेय विद्यार्थी विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १ ली ते ७ वीमध्ये २ लाख ६४ हजार ३५२ विद्यार्थी आहेत. तर ८ वी ते १२ वीमध्ये १ लाख २९ हजार ९३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगाने होत असल्याने पालिकेने ८ वी ते १२ पर्यंतच्या शाळा गुरुवार, २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी पालिकेने प्रसिद्धिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे.

पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. माझी मुलगी ४ थीमध्ये आहे. तिचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे आमच्या मनात साशंकता होती. मात्र सध्या १ ली ते ७ वीचे वर्ग सुरू होणार नसल्याने आमच्या मनावरील दडपण दूर झाले आहे, अशी प्रतिक्रिया वसईत राहणाऱ्या किंजल पटेल या गृहिणीने दिली आहे.

१५ ते १६ वर्षे वयोगटाचे लसीकरण ७६ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाच्या निर्देशानुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. त्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. शहरात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या ७६ हजार ८२६ एवढी आहे. त्यापैकी ५८ हजार ७५८ मुलांनी लशींची पहिली मात्रा घेतली आहे. या लसीकरणाची टक्केवारी ७६.०६ टक्के एवढी असल्याची माहिती पालिकेने दिली.