वसई :वसई विरार मध्ये एकापाठोपाठ एक दुर्घटना समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी सकाळी वसईत स्कायवॉकचा काही भागात राहदारीच्या मार्गात कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्कायवॉकच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे स्काय वॉकचे लेखा परीक्षण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वसई आणि विरार स्थानकाजवळ कोट्यावधी रुपये खर्चून ‘एमएमआरडीए’ने स्कायवॉक बांधले. रेल्वे स्थानकांजवळ अरुंद रस्ते असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. परिणामी पायी चालणाऱ्यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यावर उपाय म्हणून विरार पूर्व तसेच पश्चिम व वसई पश्चिम येथे स्कायवॉक बांधण्यात आले आहेत.
स्कायवॉक बांधून सुमारे १२ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र त्याची देखभाल व ते सुस्थितीत आहेत किंवा नाही याची पाहणी केली जात नसल्याने काही ठिकाणी स्कायवॉक धोकादायक स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.बुधवारी सकाळी वसई पश्चिमेच्या वर्तक महाविद्यालयाच्या समोरील स्कायवॉकचा काही भाग अचानक कोसळला. विशेषतः राहदारीला असणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली आहे. दररोज येथून महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक येथून ये जा करतात. अशा मार्गावर ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सद्यस्थितीत या स्कायवॉकचा वापर फारच कमी झाला आहे. हे स्कायवॉक वापराविनाच पडून आहेत. त्यामुळे हे स्कायवॉक धोकादायक बनत आहेत. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकचे लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी भाजपचे महेश सरवणकर यांनी केली आहे.
वसई विरार मध्ये असलेले स्काय वॉक च्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या जातील.दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त महापालिका
स्कायवॉकवर गर्दुल्ल्यांचा वावर
स्कायवॉक वर लक्ष देण्यासाठी कोणीच नसल्याने याठिकाणी गर्दुल्ले, भिकारी, व्यसनाधीन यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असल्याने विशेष करून महिलांना येथून प्रवास करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत यासाठी पालिकेतर्फे याकडे लक्ष देऊन या परिसराची स्वच्छता करण्यात यावी व अशा प्रकारे गर्दुल्ले वावरत आहेत त्यांना पायबंद घालावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तर दुसरीकडे स्कायवॉकवर प्रेमी युगलांचे सुरु असणारे चाळे त्रासदायक ठरत असल्याचे पादचाऱ्यांसह म्हणणे आहे.