|| सुहास बिऱ्हाडे
शहरातील बेपत्ता मुलींच्या प्रकरणाची राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांकडून गंभीर दखल
वसई: वसई-विरार शहरातून बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या प्रकरणाची गंभीर दखल राज्याच्या महिला बाल विकास विभागाने घेतली आहे. अशा मुलींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी जनजागृती आणि समुपदेशन करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत एकूण वसई-विरार शहरातून एकूण २०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १७० मुलींचा शोध लागला असून अद्याप ३५ मुली बेपत्ता आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरातून देखील अल्पवयीन मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षात जानेवारी ते मे या पाच महिन्यांत पोलीस आयुक्तालय हद्दीतील २०६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या बेपत्ता मुलींपैकी १७० मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ३६ मुलींचा शोध लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान शहरातून अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांची गंभीर दखल राज्याच्या महिला व बालविकास खात्याने घेतली आहे. अल्पवयीन मुलींच्या गायब होण्याचं प्रमाण चिंताजनक आहे. या मुलींची मानवी तस्करीचा धोका लक्षात घेऊन सातत्याने महिला बालविकास, पोलिस, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने मोहीम हाती घेत असतं. काही ठिकाणी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चूक लक्षात आल्यावर या मुली परत येतात किंवा घाबरून परतण्यास तयार नसतात. ही एक सामाजिक समस्या आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. मुली वयात येत असताना त्यांच्याशी पालकांचा संवाद राहिला पाहिजे. समुपदेशन झालं पाहिजे. ज्या भागांत अशा घटना वाढतायत त्या भागांत जनजागृती करण्यात येईल. अल्पवयीन मुलींना फूस लावणाऱ्यांवर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या, तसेच शहरातील बेपत्ता ३६ मुलींचा शोध युद्धपातळीवर घेण्याच्या सूचना देण्यास आल्याची माहिती अॅड. ठाकूर यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीं बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो आणि त्यांचा शोध घेतला जातो. करोना काळातही मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक मुलींना परराज्यातून शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. उर्वरित ३६ बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जनजागृती मोहीम
अल्पवयीन मुली घर सोडून पळून जाणाच्या घटना एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे मुली आणि त्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. मुली या आभासी विश्वाास रमत असतात. त्यांना वास्तविक जीवनातील सत्य माहीत नसतं. त्याची जाणीव करून त्यांना संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी आम्ही जनजागृती मोहीमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. वसई विरारचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी बेपत्ता मुला मुलींच्या शोधासाठी १७ कलमी कार्यक्रम तयार केला होता. त्याचा देखील या शोध कार्यात प्रभावी वापर केला जात आहे.
प्रेमसंबंधातून पळून जाण्याचे प्रमाण जास्त
घर सोडून पळून जाणाऱ्या मुलींपैकी सर्वाधिक मुली प्रेमप्रकरणातून पळून जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. वयात येणाऱ्या मुली या कुणाच्याही प्रेमात पडतात आणि प्रियकराकडून भावी संसाराच्या स्वप्नांना भुलून घर सोडून जातात. आईवडील रागावले, मनाविरोधात घडले तरीदेखील मुली घर सोडून जात असतात. ज्या मुलींचा शोध लागतो त्यांचे पालक तक्रार देण्यास तयार नसल्याने गुन्हा दाखल केला जात नाही, असे पोलीस सांगतात.
मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. वसई विरार शहरातील बेपत्ता मुलींच्या शोधासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम घेण्याचे तसेच मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत -अॅड. यशोमती ठाकूर, महिला बालविकास मंत्री