वसई : वसई विरार भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता ७०० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. आता पर्यँत ४९३ इतक्या गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे वसई विरार मधून दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणवासीय चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष सेवा पुरविली जाते.
यात पालघर एसटी महामंडळातर्फे वसई , अर्नाळा , नालासोपारा तीन आगारातून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. यंदाही महिनाभर आधीपासूनच विशेष गाड्यांचे नियोजन करून त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून खाजगी बस चालकांकडून होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा शंभर अधिक बस म्हणजेच ७०० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. यातील सर्वाधिक गाड्या या नालासोपारा बस आगारातून सोडल्या जातात.
२७ ऑगस्टला गणेशोत्सवाला प्रारंभ असल्याने २३ ते २६ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधी मध्ये या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. एसटीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ४९३ इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले आहे.एसटीच्या संख्येत दुपटीने वाढ मागील दोन वर्षांपासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी एसटीच्या बस सेवेला प्रतिसाद दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सुरुवातीला केवळ २५० ते ३०० गाड्या नियोजित केल्या जात होत्या. परंतु आता त्याचा दुपटीने गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यंदा ७०० गाड्या नियोजित केल्या आहेत असे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. ऑनलाइन गट नोंदणी सुरू आहे आतापर्यंत ७० टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. कैलास पाटील, विभाग नियंत्रण पालघर एसटी महामंडळ