टिवरी रोड ते ‘सेव्हन स्क्वेअर’कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

वसई: नायगाव पूर्वेतील टिवरी ते सेव्हन स्क्वेअरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पावसाळ्यात येथील नागरिकांना साचलेल्या पाण्यातून पायवाट काढावी लागत आहे.

नायगाव पूर्वेतील टिवरी ते सेव्हन स्क्वेअरकडे जाणारा रस्ता आहे, परंतु या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या भागात मोठय़ा संख्येने नागरी वस्ती असल्याने हा रस्ता वर्दळीचा असतो. विशेष करून या भागात शाळा आहे. सध्या शाळा सुरू नसल्या तरी इतरवेळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना पावसाळ्यात या पाणी भरलेल्या रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा महापालिकेकडे केली होती. त्यानुसार २०१९ मध्ये टिवरी ते सेव्हन स्क्वेअपर्यंतच्या रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले होते. यासाठी १ कोटी १९ लाख २५ हजार इतक्या निधीची तरतूद ही करण्यात आली होती. मात्र अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. मात्र करोनाचे संकट असल्याने याची निविदा प्रक्रिया ही थांबविण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले असल्याचे उत्तर येथील नागरिकांना देण्यात आले होते. पावसाळा सुरू असल्याने नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर चिखल असल्याने येथे दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

टिवरी ते सेव्हन स्क्वेअर या शाळेचा रस्ता मंजूर होऊन दोन वर्षे उलटून गेली तरी अजूनही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे येथून ये-जा करताना नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिकेला निवेदन देण्यात आले आहे.

– चेतन घरत, सामाजिक कार्यकर्ते