वसई: वसई पश्चिमेतील पापडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पथदिव्यांची समस्या गंभीर बनली आहे. दिवसा सुरू असणारे दिवे रात्री बंद असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वसई पश्चिमेकडे पापडी हा परिसर आहे. येथील दाट वस्तीच्या भागातून वसई गाव, भुईगाव, होळी, रानगाव अशा विविध ठिकाणांना जोडणारा एक छेदरस्ता जातो, ज्याला इतर लहान मोठे रस्ते जोडले गेले आहेत. या रस्त्याच्याशेजारी असलेले पथदिवे गेले पंधरा दिवस बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या सुमारास ये जा करताना अडचणी येत आहेत.

पापडी हा दाट लोकवस्ती असणारा परिसर असल्यामुळे इथून बरेच जण पायी ये-जा करतात. पण सायंकाळी आणि खासकरून रात्रीच्या वेळेत पथदिव्यांच्या अभावी संपूर्ण रस्ताभर अंधार पसरतो. त्यामुळे रात्री-अपरात्री कामावरून परतणारे नागरिक, लहान मुले, वृद्ध त्यांना टॉर्च हातात घेऊनच प्रवास करावा लागतो. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यावरील पथदिवे १५ दिवसांपासून बंद आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः रस्त्याच्या वळणांवर अपघाताची शक्यता अधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रात्री बंद असणारे हेच पथदिवे दिवसा मात्र सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत.

संबंधित परिसरात किती पथदिवे सुरू आहेत आणि किती बंद याची पाहणी करून त्यांची दुरुस्ती केली जाईल अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांनी दिली.