scorecardresearch

वसई तालुक्यात ३० वर्षांत प्रथमच चाफा उत्पादनात अचानक घट; ९० टक्के उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

यंदाच्या मोसमात चाफ्याच्या उत्पादनात अचानक मोठी घट झाल्याने वसईतील शेतकरी हवालदिल  झाले आहेत. 

वसई तालुक्यात ३० वर्षांत प्रथमच चाफा उत्पादनात अचानक घट; ९० टक्के उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल
वसई तालुक्यात ३० वर्षांत प्रथमच चाफा उत्पादनात अचानक घट

वसई: यंदाच्या मोसमात चाफ्याच्या उत्पादनात अचानक मोठी घट झाल्याने वसईतील शेतकरी हवालदिल  झाले आहेत.  मागील ३० वर्षांत पहिल्यांदा असे संकट आले आहे. चाफ्याचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 वसई तालुक्यात मोठय़ा प्रमाणात चाफा या पिकाची बागायती शेती केली जाते. चाफा हे बारमाही पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली आहे. चाफा फूल नाशवंत असल्याने शेतकरी पहाटे लवकर उठून फुले तोडून बाजारात पाठवितात. मुंबई बाजारपेठ जवळ असल्याने या फुलांना चांगला भाव मिळतो. मार्च ते जुलैमध्ये चाफ्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन येते. परंतु या वर्षी चाफा पिकाचा बहर उशिराने आला पण दरवर्षीप्रमाणे उत्पादन आले नाही, चाफा हे बारमाही पीक असल्यामुळे कमी-जास्त प्रमाणात फुले येतातच येतात. पण या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाडावर कळय़ाच दिसेनाशा झाल्या. ज्या मोठय़ा शेतकऱ्यांकडे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दिवसाकाठी ५ हजार ते ८ हजार नग चाफा निघायचा त्यांच्याकडे आता फक्त १५० ते २०० नग चाफा निघाला आहे ज्या लहान शेतकऱ्यांकडे ५०- १०० झाडे आहेत अशांकडे तर फक्त ५-१५ नग चाफा निघाला आहे तर काही शेतकऱ्यांकडे एकही फूल आलेले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

 हे असे का झाले असावे, असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे, असे अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बोलावून या समस्येवर संशोधन करून शेतकऱ्यांना या संकटातून सोडवावे अशी मागणी वसईतील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

गणेशोत्सव कोरडा

गणेशोत्सवामध्ये चाफ्याच्या फुलांना मोठी मागणी असते. वर्षभरातील सर्वात जास्त कमाई गणेशोत्सवामध्ये होत असते. सर्वात चांगला भाव चाफ्याच्या  फुलांना मिळत असतो. यंदा अशा वेळी चाफा नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळय़ात पाणी आले. उत्पादन ९० टक्क्यांनी घटले आहे. या वर्षी चाफ्याचे उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांचा गणेशोत्सव कोरडा गेला.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या