पावणेतीन लाखांहून अधिक लशींच्या मात्रा उपलब्ध

वसई: सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच वसई विरारमध्ये लसीकरण मोहिमेला चांगलीच गती मिळाली आहे. चालू महिन्यात पालिका व तालुका आरोग्य विभाग मिळून पावणेतीन लाखाहून अधिक लशींच्या मात्रा उपलब्ध झाल्याने वसईकरांना मोठा लसदिलासा मिळाला आहे.

करोनासंसर्गावर प्रतिबंध उपाय म्हणून वसई विरार शहरात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात विविध ठिकाणची लसीकरण केंद्रेही सुरू केली. परंतु मागील काही महिन्यात शहरी व ग्रामीण या दोन्ही भागासाठी उपलब्ध होणारा लससाठा तुटपुंज्या स्वरूपाचा होता. त्यामुळे वारंवार लसटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत होता, तर काही वेळा लस उपलब्ध झाली तरी लशीच्या संख्येच्या आठ ते दहा पट इतकी गर्दी लसीकरण केंद्रावर होत होती, तर काहीजणांना लसमात्रा मिळविण्यासाठी रात्रीपासूनच लसीकरण केंद्रावर जाऊन जागरण करावे लागत होते. अनेकदा लसीकरण केंद्रे ही लशींअभावी बंद ठेवावी लागत होती. यामुळे सर्वच वयोगटातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत होती. मात्र सप्टेंबर महिना सुरू होताच शासनाकडून मिळणारा साठा अधिक प्रमाणात मिळू लागला आहे. त्यामुळे वसई शहरी व ग्रामीण भागात मेगा लसीकरण मोहिमा घेण्यास सुरुवात झाली आहे. मागील १७ दिवसात पालिकेला २ लाख ६१ हजार ७०० इतक्या लसमात्रा  मिळाल्या आहेत, तर ग्रामीण भागासाठी २८ हजार ९० अशा एकूण २ लाख ८९ हजार ७९० इतक्या लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. आतापर्यंतच्या सर्वाधिक लसमात्रा या सप्टेंबर महिन्यात उपलब्ध झाल्या आहेत.

लसीकरण केंद्रातही विभागाच्या लोकसंख्येनुसार लससाठा दिला जात असल्याने त्या ठिकाणीही सुनियोजितपणे लसीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. जरी लसीकरण केंद्रावर गर्दी दिसत असली तरी उपस्थित असलेल्या बहुतांश नागरिकांना लस मिळत असल्याने लसीकरण केंद्रावरील गोंधळही कमी झाल्याचे चित्र वसईत दिसून आले आहे.