खासगी पाणीपुरवठा करणारे तलावाजवळ ठाण मांडून; प्रशासनाचे दुर्लक्ष

मयुर ठाकूर

भाईंदर :  एकीकडे मीरा-भाईंदर शहरात गंभीर प्रमाणात पाणी टंचाईची समस्या  निर्माण झाली असताना दुसरीकडे पालिकेच्याच मालिकेच्या तलावतील पाणी विकून खासगी पाणी वितरक मालामाल होत आहे. धक्का दायक बाब म्हणजे पालिकेच्या तलावाचा गैरवापर होत असताना देखील प्रशासनाला कोणत्याही स्वरूपाची माहिती नसल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदर शहरात २१ एकूण तलाव आहेत. या तलावाभोवती  कोटय़वधी रुपये खर्च पालिकेने उद्यानाची निर्मिती केली आहे. त्यामुळे शहर सुशोभीकरणात मोठी भर पडली  आहे. तसेंच संध्याकाळच्या सुमारास अनेक नागरिक या तलावामधील माश्याना खाद्य पदार्थ टाकण्याकरिता भेट देत असल्याने ही तलावे नागरिकनांच्या आकर्षणाची केंद्रे बनली आहेत.मात्र या तलावांचा गैरवापर करणाऱ्या व्यवसायिकांची देखील टोळी शहरात सक्रिय झाली आहे.हे व्यावसायिक या उद्यान व तलावाभावती  पाणी वितरण केंद्र उभारून तलावाच्या पाण्याची  सर्रास पणे विक्री करत आहेत.

सध्या मीरा-भाईंदर शहरात गेल्या पाच महिन्यापासून गंभीर प्रमाणात पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकरिता अनेक नागरिक खासगी पाणी वितरकांचा आधार घेत आहे. हे पाणी केवळ पिण्याऐवजी इतर कामांसाठी वापरले जात असल्याने पाणी वितरक चक्क तलावाचेच पाणी विकत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे पाणी वितरक आपला व्यवसाय थेट तलावाच्या भवती कार्यालय टाकून चालवत आहेत. यात नवघर येथील जुने तलाव, गोड देव येथील तलाव, काशी मिरा येथील तलावांचा समावेश आहे.

तलाव हे पालिकेच्या मालिकेचे असल्याने त्या तलावांची देखभाल करण्याकरिता प्रतिवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र पाणीटंचाई काळात टँकर माफियासह आता तलाव माफिया देखील सक्रिय झाले असताना पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

प्रशासनाला तलावांचा विसर 

मीरा-भाईंदर शहरातील तलावांच्या पाण्याचा वापर हा शहरातील आणि उद्यानातील झाडांना पाणी टाकण्याकरिता होता. मात्र तलावामधील मासे आणि इतर गोष्टीची देखरेख करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. तर यापूर्वीच्या आयुक्तांनी तलावाची जबाबदारी उद्यान विभागाकडे सोपावली असल्यामुळे सर्व देखरेख त्याच विभागामार्फत होत असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. यामुळे दोन्ही विभागामध्ये तलावाच्या देखरेखीबद्धल ताळमेल नसल्यामुळे पालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचे आरोप करण्यात येत आहे.