वसई: नायगाव येथील चिंचोटी धबधब्या जवळील नदीत बुडून मागील २४ तासात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर शुक्रवारी दोन तरुणांचा मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात वसईत झालेला हा ८ वा बळी आहे. पावसाला सुरुवात झाली असून पर्यटक वसई विराच्या समुद्रकिनाऱ्यावर तसेच तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथील धबधबे पाण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात ही ठिकाणे धोकादायक बनली असून त्यावर पोलिसांनी यापूर्वीच बंदी घातली आहे.

गुरुवारी दुपारी मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा सुमित राधेश्याम यादव हा १८ वर्षे तरुण आपल्या ४ मित्रांसोबत वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील धबधब्यावर फिरायला आला होता. धबधब्या खाली असलेल्या नदीत तो पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीचे पात्र खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी नालासोपारा येथील सहा मित्रांचा गट चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. मात्र यातील दोन जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात  बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. रोहन राठोड (१९)व रवी झा (१८) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना साठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.