लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : नुकताच महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक लागल्यानंतर इव्हीएम मतमोजणीवर शंका उपस्थित करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर वसईतील टिवरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी देखील इव्हीएम मशीन हद्दपार करा असे म्हणत मतपत्रिकेवर ( बॅलेट पेपरवर) मतदान घेण्याचा ठराव पारित केला आहे. या ठरावाला गावच्या पोलीस पाटील यांनी नदेखील अनुमोदन दिले असून हा टिवरी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव जिल्हा स्तरावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

महिना भरा पुर्वी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर लागलेल्या अनपेक्षित निकालामुळे राज्यभरात इव्हीएम मशीन मधील मतमोजणीचा मुद्दा प्रचंड गाजला आहे. केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर मतदान केलेल्या मतदारांच्या तोंडीही इव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.सोलापूरातील मारकडवाडीतल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेत इव्हीएम मतमोजणीला आव्हान दिले होते. त्या पाठोपाठ आता वसईतील टीवरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी सुद्धा इव्हीएम यंत्रावर आक्षेप घेत मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा-नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच टीवरी ग्रामपंचायतची ग्रामसभा पार पडली. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ ग्रामसभेला जमले होते.या सभेत इव्हीएम मशीनविरोधात एकमत दाखवत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव पारित केला आहे. दरम्यान, टिवरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नुतनकुमार भोईर यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे सूचक असलेल्या ग्रामसभेत टिवरी ग्रामस्थांनी एकमताने इव्हीएम हटावचा नारा देत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे एकमताने मंजूर केले आहे. तसा ठराव पारित झाला असून या ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर यांनी अनुमोदन दिले आहे.असा ठराव करणारी टिवरी ग्रामपंचायत पालघर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.