भाईंदर : दहिसर टोल नाक्याजवळ अरुंद रस्ता असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहतूक कोंडीसह अन्य समस्याही उद्भवत आहेत. त्यामुळे हा टोल नाका येथून दोन किलोमीटर लांब, सगनई नाका (वेस्टर्न हॉटेल) जवळ स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली आहे.मुंबईच्या पश्चिम भागात दहिसर टोल नाका असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते.

वर्षभरापूर्वीच अन्य चार टोल नाक्यांसह येथे हलक्या वाहनांना पथकरमुक्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टोल नाक्याजवळील रस्ता अरुंद असल्यामुळे कोंडीतून प्रवाशांची सुटका झाली नाही.परिवहन मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक हे या टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अवजड वाहनांसाठी निश्चित वेळ व स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या उपाययोजनांनी स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता टोल नाकाच स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

“टोल नाक्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा अपव्यय होतो आणि वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते. हा टोल नाका मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील असल्याने, तो शहराच्या बाहेर वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित केल्यास वाहतूक कोंडी टळून नागरिकांना दिलासा मिळेल,” असा दावा सरनाईक यांनी केला. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

रस्त्याची देखील दुरावस्था

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून ते पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या या कामांपैकी सध्या ९७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. मात्र, दहिसर टोल नाक्याजवळील सुमारे दीड किलोमीटरचा पट्टा मागील तीन वर्षांपासून रखडलेला आहे. दहिसर टोल नाक्याजवळ एका बाजूला मेट्रोचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण नियोजित करणे अत्यंत कठीण झाले आहे. यापूर्वीही वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी कामासाठी परवानगी दिली नव्हती. परिणामी, तोच पट्टा रखडला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.