वसई: वसई पूर्वेतील भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी जाण्याचे मार्ग बंद असल्यामुळे गुरुवारी झालेल्य पावसामुळे महामार्गावर विविध ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम हा वाहतुकीवर झाला असून वाहतूक मंदावली असून वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवाशांचे  हाल झाले आहेत.

महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालजीपाडा, ससूनवघर, वर्सोवा पुलाजवळ अशा विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे मुंबईच्या दिशेने व वसई- विरार दिशेने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. महामार्गवर वर्सोवा पुलापासून ते विरार फाटय़ापर्यंत विविध ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक मार्गावर नाले तयार करण्यात आले आहेत. या नाल्यात व नाल्याशेजारी माती भराव, इतर ठिकाणचा टाकाऊ कचरा आणून टाकला जात असल्याने नाल्याची रुंदी कमी होऊन पाणी जाण्याचे मार्ग बंद होऊ  झाले आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरीही महामार्ग पाण्याखाली जात आहे. आधीच नागरिक महामार्गावर पडलेल्या खड्डय़ामुळे त्रस्त  आहेत. त्यातच  पावसामुळे  समस्येत भर पडली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व मुंबईहून वसईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गती कमी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्या होत्या. हलक्या वाहनांना साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना चालकांचे हाल झाले.  दुचाकी गाडय़ा, रिक्षा या साचलेल्या पाण्यात बंद पडल्याने या भरलेल्या पावसात धक्का मारत ती बाजूला काढावी लागली. साचलेल्या पाण्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनाही वाहनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी कसरत करावी लागली. तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने चालकांसह प्रवाशांचे हाल झाले. 

समस्यांबाबत भूमिपुत्रांचा संताप 

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, खासदार राजेंद्र गावित, महामार्ग प्राधिकरण, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी दौरा केला. यात भूमिपुत्रांनी महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासन यांच्या गलथान कारभारामुळे आज महामार्गावर समस्या निर्माण होत असल्याने सांगत तीव्र संताप व्यक्त केला आहे. भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. महामार्गावर साचणारे पाणी, खड्डे यामुळे वाहतूक कोंडी, अपघात असे प्रकार घडत आहेत. सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुले यांना याचा फटका बसत आहे. शाळेतून मुले ही लवकर सुटतात; परंतु वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे त्यांना घरी येण्यास उशीर होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. या समस्या लवकर दूर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.