निलंबित असतानाही आगार ताब्यात; रस्त्यावर उभ्या भंगार बसचा नागरिकांना अडथळा
वसई: पालिकेने निलंबित केलेल्या परिवहन ठेकेदाराने अद्याप पालिकेचे आगार रिकामे केले नसून त्याच्या भंगार झालेल्या बस रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जागा खाली करण्यासाठी पालिकेने वारंवार नोटीस बजावूनही ठेकेदाराने जागा रिकामी केली नसल्याने नवीन ठेकेदाराना बस वाढविण्यात येत नसल्याचे पालिकेने सांगितले.
पालिकेची परिवहन सेवा भगीरथी ट्रान्सपोर्ट या खासगी ठेकेदारामार्फत. परंतु ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी होत्या. नादुरुस्त बस, योग्य सेवा न देणे अशा तक्रारी सातत्याने येत होत्या. मागील वर्षी करोना संक्रमण काळात त्याने आर्थिक कारण देत सेवा बंद ठेवली होती. त्याचा फटका शहरातील हजारो सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. टाळेबंदीमध्ये इतर महापालिकांच्या परिवहन सेवा सुरू असताना केवळ वसई विरार महापालिकेचीच सेवा बंद होती. पालिकेने सेवा सुरू करण्याबद्दल वारंवार ठेकेदाराला सांगितले. मात्र त्याने सेवा सुरू केली नव्हती. त्यामुळे पालिकेने भगीरथी ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराची सेवा बंद करून त्याचा ठेका रद्द केला होता. यानंतर पालिकेने जानेवारी २०२१ मध्ये निविदा काढून नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्यामुळे आता वसई-विरारमधील चौदा मार्गिकेवर नवीन ठेकेदाराच्या बस धावत आहे. नवघर पूर्व येथील आगाराची जागा भगीरथी ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराला दहा वर्षांच्या करारावर दिलेली होती. त्याचा ठेका रद्द केल्यानंतर त्याने ती जागा खाली करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप त्याने जागा रिकामी केलेली नाही. त्याच्या ५८ बस भंगार अवस्थेत असून त्या नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. त्याची मुदत जरी ऑक्टोंबर २०२२ ला संपत असली तरी परिवहन सेवेसंबंधी करार मोडीत निघाल्यामुळे सदरची जागा खाली करण्यात यावी अशी मागणी पालिकेच्या वतीने सदर कंपनीला करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या ३० व भगीरथी ट्रान्सपोर्ट च्या १३० अशा एकूण १६० बसेस वसई-विरारमध्ये परिवहन सेवा देत होत्या. मात्र गेल्या सव्वा वर्षांत परिवहन सेवा बंद झाल्यामुळे या सर्व बसची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे .
नवघर येथील बस आगारात भगीरथी ट्रान्सपोर्टच्या सगळ्या आगारात ४८ व औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर १० बस अशा एकूण ५८ बस भंगारात गेलेल्या असल्यामुळे जागीच उभ्या आहेत. या बस त्वरित तेथून हटविण्यात याव्यात, अशी नोटीस भगीरथी ट्रान्सपोर्टला देण्यात आल्याची माहिती प्रभारी साहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी दिली. या भंगार बसमुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडथळे येत आहेत. भंगार बसमुळे परिसर बकाल झाला असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नवीन ठेकेदाराला दुसरी जागा
जुना परिवहन ठेकेदार जागा रिकामी करत नसल्याने नवीन ठेकेदाराला बस वाढवता येत नाही. जागेअभावी त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिकेने नवीन ठेकेदाराला आगारासाठी वसई पूर्वेच्या सातीवली परिसरातील गावदेवी येथील अडीच एकर जागा देण्यात आली आहे.
भगीरथीच्या ठेकेदाराने नवघर पूर्व येथील जागा रिकामी केल्यानंतर या ठिकाणी सर्विस सेंटर उभे करण्यात येणार आहे. पालिकेच्याही नादुरुस्त बस दुरुस्त केल्या जाणार आहेत.