विरार : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटाच्या कथेची पुनरावृत्ती वाटावी, अशी घटना वसईत उघडकीस आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत.

पोलिसांनी या चार आदिवासी महिलांना चोरीच्या केवळ संशयावरून ताब्यात घेतले. त्यांना मारहाण केली आणि चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. इतकेच नव्हे तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली नाही, अशी माहिती आदिवसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. 

पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यातील कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारूसुभाष डोकफोडे या सहा आदिवासी महिला वसईच्या पापडी तलाव, कोळीवाडा या ठिकाणी राहतात आणि मोलमजुरीचे काम करतात. या महिला शुक्रवारी पापडी येथे बाजारात गेल्या होत्या. बाजारहाट करताना काही नागरिकांनी त्या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या महिलांना पापडी येथील पोलीस चौकीत नेले. तेथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना लाठीने मारहाण करून पुन्हा बाजारात दिसू नका, अशी धमकी दिली. या महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटनांना माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता केवळ समज देण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला. तर वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

गुरुवारी मोर्चा

संबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटना आणि लालबावटा संघटनेने केली आहे.  याप्रकरणी २५ नोव्हेंबरला वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी कार्यकर्ते कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला. 

या प्रकरणाचा तपास वसई सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला आहे, त्यांच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल.

 – संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त