scorecardresearch

वसई, विरारमध्ये पक्षीगणना सुरू ; पहिल्या टप्प्यात दोन हजार पक्ष्यांची नोंद

आशियाई पाणपक्षी गणना २०२३ या उपक्रमाअंतर्गत ही गणना करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

वसई, विरारमध्ये पक्षीगणना सुरू ; पहिल्या टप्प्यात दोन हजार पक्ष्यांची नोंद
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

वसई : वसई, विरार शहरात महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पाणथळ जागेवर येणाऱ्या पक्ष्यांची गणना करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी या गणनेचा पहिला टप्पा पार पडला असून यामध्ये दोन हजारहून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

आशियाई पाणपक्षी गणना २०२३ या उपक्रमाअंतर्गत ही गणना करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ७, १४ व २१ जानेवारी अशा तीन टप्प्यांत ही गणना केली जात असून यात पालिकेचे अधिकारी, पक्षीतज्ज्ञ, पक्षी अभ्यासक, महसूल विभाग, वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची मदत घेण्यात येत आहे.   शनिवारी या पक्षीगणनेचा पहिला टप्पा पार पडला. यामध्ये शहरातील विवा वेटलँड, चिखलडोंगरी, भुईगाव समुद्रकिनारा, गोगटे सॉल्ट वसई, राजोडी वेटलँड, गोगटे सॉल्ट नालासोपारा, निर्मळ लेक, कळंब पुलाजवळ, उमराळे अशा नऊ ठिकाणच्या पाणथळ जागांवर पक्ष्यांची गणना करण्यात आली आहे. गणना ही वैज्ञानिक पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने पक्ष्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे राहणीमान, त्यांचे खाद्यपदार्थ अशा विविध बाबी प्रकर्षांने नोंदविल्या जात आहेत असे पालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त सागर घोलप यांनी सांगितले आहे. अजूनही पुढील दोन टप्पे बाकी आहेत, त्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही घोलप यांनी सांगितले आहे.

शिकार करणाऱ्यांवर आवर घाला

वसईचा परिसरात  विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. मात्र काही ठिकाणी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी सापळे लावले जातात. यामुळे पक्ष्यांचा अधिवास हा धोक्यात येत आहे. शिकार थांबून त्यांचे संरक्षण व्हावे व इतर ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील ते रोखले जावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नेस्ट संस्थेचे पक्षी निरीक्षक सचिन मेन यांनी सांगितले आहे.

करकोचा, पाणकावळे, खंडय़ा

गणनेदरम्यान पाणथळ जागी उघडचोच करकोचा, रंगीत करकोचा, शेकाटे, तुतारी, पाणकावळे, खंडय़ा, सुरई, शराटी, बगळे, पाणकोंबडय़ा इत्यादी प्रजातींचे सुमारे दोन हजार १०० इतके पक्षी दिसून आले असल्याची माहिती नेस्ट संस्थेचे पक्षी निरीक्षक सचिन मेन यांनी सांगितले आहे.

पालिकेने शहरातील पाणथळ जागेत पक्षीगणना सुरू केली आहे. पूर्ण नियोजन करूनच ही गणना होत आहे. पालिकेकडून प्रथमच अशा प्रकारची गणना केली जात आहे.  – सागर घोलप, उपायुक्त, महापालिका पर्यावरण विभाग

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 05:10 IST

संबंधित बातम्या