वसई: कामण बापाणे रस्त्याचे काम मंजूर होऊनही या कामाची सुरुवात झाली नाही, पण या रस्त्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे जोमाने फोफावत आहेत. ही अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी होते आहे.
वसई पूर्वेला कामण, बापाणे परिसर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग यांना जोडणारा कामण-बापाणे असा रस्ता तयार करण्यात येणार होता. त्यामुळे कामण-बापाणे अंतर सात किमीनी कमी होणार होते. कोल्ही चिंचोटी येथील सतत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कामण- बापाणे रस्ता साहाय्यक ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सन १९८७ साली या रस्त्यासाठी अर्थसंकल्पात १८.८३ लक्ष रकमेची तरतूद करून रस्त्यासाठी जमिनी संपादित केल्या होत्या. तसेच ही जागा रस्ता तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात दिली होती. मात्र आज ३२-३३ वर्षे लोटली तरी या रस्त्यांचे काम झालेले नाही. आता रस्त्याची ही जागा वसई विरार महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याकडून आपल्या ताब्यात घेतली आणि रस्त्यासाठी निधीही मंजूर केला. या घटनेलाही तीन वर्षे लोटली, पण अजून या कामासाठी साधी निविदा काढलेली नाही. त्यामुळे कामाला सुरुवात तर दूरचीच गोष्ट आहे. आता या रस्त्याच्या
जागेत मोठी अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या कामातील अडथळय़ांत वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेने तातडीने ही अतिक्रमणे हटवावी आणि रस्त्याच्या कामासाठी निविदा काढावी, अशी मागणी रस्ता संघर्ष समितीतर्फे करण्यात आल्याचे केदारनाथ म्हात्रे यांनी सांगितले आहे.
कामण- बापाणे रस्त्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी कामण भिवंडी रोडवर कामण विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले जाणार आहे. महिलाही या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात सहभागी होणार
आहेत. आस्था महिला बचत गट तसेच राम रहीम महिला एज्युकेशन ट्रस्टनेही लेखी पत्राद्वारे रस्त्याच्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे सांगितले.